संत नामदेवांचे अभंग मुमुक्षूंस उपदेश

Mumukshuns Updesh : Sant Namdev Ji

मुमुक्षूंस उपदेश
1

तुह्मां हित करणें आहे । सेवा राघोबाचे पाय ॥१॥
दुष्टबुद्धि दुरी करा । तोडा अविद्येचा थारा ॥२॥
करा तुमचें मन । तुह्मां जवळी नारायण ॥३॥
नामा ह्मणे दृढ धरा । तारी निर्वाणीं चाकरा ॥४॥

2

मृगजळडोहो कां उपससी वांयां । वेगीं लवलाह्या शरण रिघें ॥१॥
भजे तूं विठ्ठला सर्वांभूतीं भावें । न लगती नांवें आणिकांचीं ॥२॥
होईल सुटका घडेल भजन । नाम  जनार्दन येईल वाचे ॥३॥
नामा ह्मणे घडे भजन विठ्ठलीं । ऐसीये निमोली भक्ती करी ॥४॥

3

हरिसी शरण निघा वहिलें । राहे कळिकाळ उगलें ॥१॥
खंडलें एका बोलें । विठ्ठल समर्थें अंगिकारिलें ॥२॥
नामयानें संसारा जिंकिलें । केशव चरणीम मन ठेविलें ॥३॥

4

न लगती डोंगर चढावे । हळुच पाऊल धरावें ॥१॥
विठ्ठलाचे पाय बरवे । गंगा विनविते स्वभावें ॥२॥
नामा ह्मणे तीर्थ बरवें । मुकुटीं धरिलें सदाशिवें ॥३॥

5

आतां पांडुरंग स्मरा । जन्ममृत्यु चुकवी फेरा ॥१॥
ऐसा कांहीं करा नेम । मुखीं स्मरा कृष्णराम ॥२॥
चिंता ऐसें ध्यान । तेणें असा समाधान ॥३॥
न:मा ह्मणे हरिदास । त्यासि असावा अभ्यास ॥४॥

6

हरिकथा ऐकतां अनन्य पैं गोष्टी । निधान त्यां दृष्टी अंतरलें ॥१॥
घडी घडी प्रेम अंतरूम न द्यावें । सावधान व्हावें रामनामीं ॥२॥
यापरी स्वहितीं ठेवियलें लक्ष । ते पावती मोक्ष म्हणे नामा ॥३॥

7

कासवीचे दृष्टी जें येईजे भेटी । तैं अमृताची वृष्टि घडे त्यासी ॥१॥
तैसें हें भजन श्रीरामा वें ध्यान । वाचे नारायण अमृत-मय ॥२॥
धन्य त्यावें कुळ सदां पैं सुफळ । दिननिशीं फळ रामनाम ॥३॥
नामा ह्मणे चोखट भक्त तो उत्तमू । वाचेसी सुगमु रामनाम ॥४॥

8

कृष्णकथा सांग जेणें तुटे पांग । न लगें तुज-उद्वेग करणें कांहीं ॥१॥
समर्थ सोयरा राम हा निधान । जनीं जनार्दन एक ध्याईं ॥२॥
नाम हेंचि सार नाम हेंचि सार । तराल निर्धार श्रुति सांगे ॥३॥
नामा म्हणे उच्चार रामकृष्ण सार । तुटेल येरझार भवाब्धीची ॥४॥

9

एकवेळ नयनीं पहावा । मग जाईजे भलत्या गांवा ॥१॥
आठवाल वेळोवेळां । विठोबा आहेरे जवळां ॥२॥
ह्लदयीं मांडू-नियां ठसा । नामा म्हणे केशव असा ॥३॥

10

रामनाम वाचे बोल । तया पुरुषा नाहीं मोल ॥१॥
धन्य तयाचें शरीर । बरे जना उपकार ॥२॥
ऋणियां तो तारी । विश्व व्यापक तो हरि ॥३॥
नामा म्हणे स्वामी । सुखें वसे अंतर्यामीं ॥४॥

11

राम म्हणतां रामचि होसी । भाक घेईं मजपाशीं ॥१॥
लवण समुद्रीं जागा मागे । तेंहि समुद्र झालें अंगें ॥२॥
वात दीपासंगें गेली । तेहि दीप अंगें झाली ॥३॥
नामा सांगे भाविक लोकां । नाम घेतां राहूं नका ॥४॥

12

केशव ह्मणतां जासी केशवपंथें । त्यांहूनि सरतें आ-णिक नाहीं ॥१॥
वेद कां पढसी शास्त्र कां सांगसी । उदंड वा-चसी हरी ह्मणतां ॥२॥
पहा याहूनियां आन नाहीं दुसरें । भीष्में युधिष्ठिर उपदेशिला ॥३॥
नामा ह्मणे धरीं केशवीं विश्वास । तरसी गर्भवास नामें एका ॥४॥

13

गुळ गोड व लगे ह्मणावा । तैसा देव न लगे वानवा ॥१॥
सेवी तोचि चवी जाणें । येरा सागतां लजिरवाणें ॥२॥
नामा ह्मणे या खुणा । तुह्मी ओंळखा पंढरिराणा ॥३॥

14

मार्गीं चालतां उगलें न चालावें । वाचेसी ह्मणावें रामकृष्ण ॥१॥
हरि बा हरि हरि मुकुंद मुरारी । माधव नरहरि केशिराज ॥२॥
ऐसा छंद वाचे सर्वकाळ जयां । नामा ह्मणे तयां दोष कैंचे ॥३॥

15

देवा सन्मुख दीपमाळा । कोणी भक्त हो उजळा ॥१॥
तेल घालारे फारसें । नामा ह्मणे रे उल्हासें ॥२॥
नामा दीपमाळ पाजळी । तेणें भक्ति त्यास झाली ॥३॥

16

तो देव स्मरारे अनंत । जो कां वैकुंठींचा नाथ ।
दृढ धरा रे ह्लदयांत । तेणें यमपंथ चुकेल ॥१॥
आकांतीं द्रौपदीयें स्मरिला । तिचीं वस्त्रें आपणचि झाला ।
सभेमाजी मान रक्षिला । काळ पैं झाला कौरवांचा ॥२॥
विमळार्जून उन्मळिला । जरासंध तोही मारिला ।
कंसासूर निर्दाळिला । कान्हया झाला गोकुळींचा ॥३॥
ध्रुव जेणें अढळपदीं बैसविला । नामें एके अजामिळ उद्ध-रिला ।
उत्तरेचा गर्भ रक्षिला । तैं सोडविला परीक्षिती ॥४॥
जाति कुळ न पाहसी । नामें एकें उद्धरिलें गणिकेसी ।
त्या गोपाळाचें उच्छिष्ट खासी । गज सोडविसी पाणियाडें ॥५॥
ऐसा तूं कृपाळु गा देवा । प्रसन्न झालसि पांडवा ।
विष्णुदास नामा विनवी केशवा । प्रेमभाव द्यावा मजलागीं ॥६॥

17

भक्त प्रल्हादाकारणें । त्या वैकुंठींहूनि धांवणें ॥१॥
नरहरी पातला पातला । महा दोषा पळ सुटला ॥२॥
शंख चक्र पद्म गदा नाभीं नाभींरे प्रल्हादा ॥३॥
दैत्य धरी मांडीवरी । नखें विदारी नरहरी ॥४॥
पावला गरुडध्वज । नामया स्वामी केशवराज ॥५॥

18

जागारे गोपाळांनो रामनामीं जागा । कळीकाळा आ-कळा महादोष जाती भंगा ॥१॥
सहस्रदळ समान अनुहात ध्वनी उठी । नामाचेनि बळें पातकें रिघालीं कपाटीं ॥२॥
दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन । एकादशी उपवास तुह्मी जागा जागरण ॥३॥
द्वादशी साधन कोठीकुलें उद्धरती । नामा म्हणे केशव ठाव देईल वैकुंठीं ॥४॥

19

निर्वाणींची हे सांगितली खूण । कैबल्य चरण विठो-बाचे ॥१॥
वेद शास्त्र स्मृति वदती पुराणें । पाहूनि जाणणें हेंचि सत्य ॥२॥
क्रिया कर्म धर्म ज्यालगिं करणें । ते खूण निर्वाण हेंचि असे ॥३॥
जप तप अनुष्ठान कां करिजे साधन । तेंचि प्रत्यक्ष निधान हेंचि असे ॥४॥
नामा ह्मणे मज कळलें अनुभवें । न सोडीं हे जीवें चरण तुझे ॥५॥

20

नामामृत सरिता चरणामृत माता । पवित्र हरिकथा मुगुट आणि ॥१॥
तेथें माझें मन होकां क्षेत्रवासी । राहेम संतांपाशीं सुख घेतां ॥२॥
अहिक्य परत्रें समतीरें साजि रीं । परमानंद लहरी हेलावत ॥३॥
मुक्तीची माउली मोक्षाची गाउली । शीणलिया सा-उली विषयताप ॥४॥
तेथें सनकादिक प्रेमळ सकळ । राहिले नि-श्चळ करोनि चित्त ॥५॥
नामा ह्मणे माझे सखे हरीजन । तारूं त्याचे चरण दृढ धरा ॥६॥

21

नित्य नेम आह्मां चिंतन श्रीरामा । आणिक उपमा नेघों नेघों ॥१॥
वळघलों हरि भूत भाव निर्धारी । दिसे चरा-चरीं हरिरूप ॥२॥
जें जें पडे दृष्टी आणिक नाहीं सृष्टी । हरिरूपीं भेटी हेंचि दिसे ॥३॥
नामा ह्मणे विठ्ठल सर्वभूतीं आहे । आणिक उपाय न लगती ॥४॥

22

एके हातीं टाळ एके हातीं दिंडी । ह्मणे वाचा उदंडीं रामनाम ॥१॥
श्रीहरीसारिखा गोसांवी पैं चांगु । फेडिला पैं पांगु जन्मांतरींचा ॥२॥
ऐसें नृत्य करी वेडें बागडें । वदन वांकुडें करू-नियां ॥३॥
चुकलें पाडस कुरंगिणी गिवसिती । तैसा ह्लषिकेशी न्या-हाळी तुतें ॥४॥
धेनु पान्हाय हुंबरे वत्सातें । तैसा वोरस तूं तें केशिराज ॥५॥
नाभा ह्मणे इतुकें न करवे निर्दैवा । तरी वाचेसि केशवा उच्चारी पां ॥६॥

23

क्रिया कर्म धर्म तिहीं केलें सांग । जिहीं पांडुरंग दाख-येला ॥१॥
ओळखोनि मनें धरिला मानसीं । उभा अहर्निशीं ह्लदय-कमळीं ॥२॥
निजानंदबोधें नामाचेनि छंद्रें । डोलती आनंदें वोसं-डत ॥३॥
नाहीं देहस्मृति निमली वासना । मावळली कल्पना भा-वाभाव ॥४॥
अखंड विदेही रजतमावेगळे । भोगिती सोहळे प्रेम-सुख ॥५॥
त्याचिय द्वारींचा झालोंसे सांडोबा । म्हणोनि केशवा प-ढिये नामा ॥६॥

24

गुण दोष त्याचे ह्मणतां श्लाधीजे । निर्वासन किजे चित्त आधीं ॥१॥
गाऊं नाचूं आनंदें कीर्तनीं । भुक्ति मुक्ति दोन्ही नको देवा ॥२॥
मनाची पैं वृत्ति बुडे प्रेमडोहीं । नाठवती देहीं दुजा भाव ॥३॥
सगुणीं निर्गुणीम एकचि आवडी । चित्तीं दिली बुडी चिदानंदीं ॥४॥
नामा म्हणे देवा मागणें ऐसी सेवा । द्यावी जी केशवा जन्मोजन्मीं ॥५॥

25

तुमचें तीर्थ आम्हीम आदरें सेवावें । तेणें तें पावावेम परब्रह्म ॥१॥
विश्वाकरवीं ब्रह्म ह्मणवितां तुह्मीं । म्हणों जी माय आम्ही पिता तुझी ॥२॥
जो तुमचे चरणीमचा तो नाहीं आम्हां । विष्णुदास नामा न तेथें ॥३॥

26

उदाराचा राजा उभयांचि काजा । उभारोनि भुजा वाट पाहे ॥१॥
म्हणे ध्यारे सुख प्रेम अलेकिक । साधन आणिक न लगे कांहीं ॥२॥
मनाचेनि मानें ह्लदयीं मज धरा । वाचेसि उ-च्चारा नाम माझें ॥३॥
जेणें कर्में मज साधिलें पुंडलीकें । तेंचि तुह्मां नि कें सांगितलें ॥४॥
अनुदिनीं आवडी करूनि नित्य नवी । मज धरा जिवीं सर्वभावें ॥५॥
म्हणोनि पांडुरंग उभा भीमातीरीं । नामा निरंतरीं वोळंगे चरण ॥६॥

27

देवराज आले मंचकीं बैसले । भक्तांसि दिधलें अभय-दान ॥१॥
दासहो तुह्मी सकळ सुखी रहा । सुखी राहोनियां आनंद करा ॥२॥
रात्रंदिवस माझें करारे चिंतन । यमाचें बंधन नाहीं तुह्मां ॥३॥
विष्णुदास नामा गाऊनियां गेला । शेजे पहुडला देवराणा ॥४॥

28

अवघे हो ऐका अवघे श्रवणीं । अवघेचि होऊनि एकचित ॥१॥
विठोबाचें नाम अवघेंचि गोमटें । विचारीम नेटेंपाटें आपुल्या मनीं ॥२॥
अवघी हेचि क्रिया अवघें हेंचि कर्म । अवघा हा स्वधर्म सत्य जाणा ॥३॥
अवघें हें सगुण अवघें हें निर्गुण । अवघें हें परिपूर्ण शुद्ध बुद्ध ॥४॥
अवघा हा आचार अवघा हा विचार । अवघा हा संसार सर्व काळ ॥५॥
अवघा जेणें दुरी ठाके भावभ्रम । निरंतर नाम गाय नामा ॥६॥

29

अवघी चित्तवृत्ति एकवटोनि जेणें । अवघा धरिला मनें पांडुरंग ॥१॥
अवघें सुख एक तयासि फावलें । अवघें सफळ झालेम जन्म त्याचें ॥२॥
अवघीं व्रतेम दानेम केलीं पैं तयानें । ज्याचें विठ्ठलीं ध्यान मन जडलें ॥३॥
नित्य विठ्ठल नाम गर्जती सप्रेमें । अवघे नित्य नेम झाले त्यांचे ॥४॥
अवघा इष्ट मित्र बंधु माता-पिता । केला आवडता पांडुरंग ॥५॥
नामा म्हणे ऐसे अवघे सं-प्रदाय । मिळोनि धरा पाय विठोबाचे ॥६॥

30

तेरा माजी तीन सात साक्षाक्तार । आठव निर्धार असी पद ॥१॥
नवमापासूनि दशमाचे अंतीं । बारावा निश्चिती योग जाणा ॥२॥
प्रथम अक्षरीं मध्यमा सूचना । नाम नारा-यणा अंतकाळीं ॥३॥
नामा म्हणे तुह्मी नाम स्मरा मनीं । वैकुंठ-भुवनीं वास होय ॥४॥

31

अनुसरे त्यासी फिरों नेदी मागें । राहे अंगसंगें समागमें ॥१॥
समागमें असे सर्व साक्षी देव । जैसा ज्याचा भाव तैसा राहे ॥२॥
सदा मुखीं नाम आळस न उच्चारी । प्रीति मानी हरि हास्यमुखें ॥३॥
फळपाकीं सर्व देतील प्राणीया । नामा धरी पाया बळकट ॥४॥

32

नागवे कळिकाळां ब्रिदावळी पाही । तोचि लव-लाहीं ध्यायिजेसु ॥१॥
स्मरण विठ्ठल चित्त पांडुरंग । नाहीं तया मग जन्ममरण ॥२॥
आपणचि नांदे भक्तांचिया घरीं । आपणचि करी सर्व कृत्य ॥३॥
नामा ह्मणे तो देव पंढरीनिवास । कळिका-ळासी वास पाहों नेदी ॥४॥

33

भीष्मासी आपण पाडियलें रणीं । गोविंदें निर्वाणीं भेटी दिल्ही ॥१॥
हरिश्वंद्र वाहे डोंबाघरीं पाणी । गोविदें नि-र्वाणीं भेटी दिल्ही ॥२॥
परीक्षिती बैसे मरण आसनीं । गोविदें निर्वाणीं भेटी दिल्ही ॥३॥
नामा ह्मणे तुह्मी देव धरा मनीं । गो=विंद निर्वाणीं भेटे तुम्हां ॥४॥

34

हरिस श्रवणीं ध्या वो नित्य तुझी । ठसावेल ध्यानीं अवघा राम जनींवनीं ॥१॥
नयनीं सखा पहा कृष्ण न्याहाळुनी । प्रकाशलें तेज रवि गेला लपोनी ॥२॥
हरिचरणीं लावी मन दर्शन । झालीया जाती त्रिविधताप हरपोन ॥३॥
तुळसीचा सुंगध मस्तकीं धरा । नामा म्हणे चरण दृढ धरा ॥४॥

35

जिव्हे केशवाचें करितां कीर्तन । मिथ्या वदूं नको एक रामाविण ॥१॥
म्हणऊनि हरिरंगीं रंगा । नाम घेतां महा पातकें जाती भंगा ॥२॥
चित्तीं चिंतितां होई तद्रूप । मिथ्या विषयीं लुब्ध झालिया काय सुख ॥३॥
पूजन करा तुह्मी अच्युताचें । नामा ह्मणे एकचित्तें साचें ॥४॥

36

संसाराबंधन केलें जेणें शून्य । तयासी अनन्य शरण रिघा ॥१॥
मायबाप सखा विठ्ठल विसांवा । त्याचे पायीं ठेवा सदा मन ॥२॥
निजरूपबोध तोचि ज्ञानदीप । आन्मदस्वरूप बाप माझा ॥३॥
नामा ह्मणे त्याच्या संगतीचा वारा । पावे पैल पारा हेळामात्रें ॥४॥

37

आगमीं नाम निगमीं नाम । पुराणीं नाम केशवाचें ॥१॥
अर्थी नाम पदीं नाम । धृपदीं नाम त्या केशवाचें ॥२॥
अनु-भवे भावें कपटें प्रपंचें । परि हरीचें नाम देऊं दे वाचे ॥३॥
नाम व्हावें नाम व्हावें । नाम व्हावें त्या केशवाचें ॥४॥
ऐसें नाम बहु सुंदर । मानीं तरले लहान थोर ॥५॥
नामा म्हणे अंतर । पडों नेदीं याउपर ॥६॥

38

जें जें पुण्य जोडे हरिनाम गजरीं । त्याचे वांटेकरी दोघेजण ॥१॥
सावधान श्रोता आणि प्रेमळ वक्ता । जो भजे अनंता निर्विकल्प ॥२॥
तेणें सुखें सुख चढे नित्य नवें । जाणती अनुभवें संतजन ॥३॥
हातीं सुदर्शन आनंदें कीर्तनीं । उभा चक्रपाणी मागें पुढे ॥४॥
प्रीतीच्या वोरसें अभयदान देत । ह्लदयीं आलिंगित आपुल्या दासां ॥५॥
धर्म अर्थ काम मोक्ष आणि मुक्ति । टाकोनियां येती विश्रांतीसी ॥६॥
नामा म्हणे धन्य ते झाले संसारीं । न संडिती वारी पंढरीची ॥७॥

39

अवघे ते संसारीं जाणावे ते धन्य । ज्यांचें प्रेम पूर्ण पांडुरंगीं ॥१॥
अवघे ते दैवाचे विठ्ठल ह्मणती वाचे । अवघें कुळ त्याचें पुण्यरूप ॥२॥
अवध्यारूपीं एक विठ्ठल भाविती । अवघ्या मनें भजती अवघेपणें ॥३॥
अवघे मिथ्या जाणोनि अवघिया वि-ठ्ठले । अवघे विनटले विठ्ठलपायीं ॥४॥
अवघे पूर्ण बोधें भावें प्रेमें प्रीती । ध्यानीं गीतीं केशिराज ॥५॥
अवघा हा विठ्ठलु भोगूं दिनराती । वोळंगें किंकरवृत्ति नामा त्यासी ॥६॥

40

साठी घडीमाजी । एक वेचीं देवकाजीं ॥१॥
आरा-णूक सारूनि काजीं । सर्वभावें केशव पूजीं ॥२॥
हेंचि भक्तीचें ल-क्षन । संतोषला नारायण ॥३॥
कोटिकुळें पावन तुझीं । नामा ह्मणे भाक माझी ॥४॥

41

तुह्मी आह्मी जाऊं चला । भेटूम जीवलगा विठ्ठला ॥१॥
विठो सांपडला फुका । जो दुर्लभ तिहीं लोकां ॥२॥
वेदपुराणासी वाड । तो हा भाविकांसी भ्याड ॥३॥
नामा ह्मणे वंदूं चरण । कांही पुसूं जिवींची खूण ॥४॥

42

पैल दक्षिणेचा वारा । येतां देखिला समोरा ॥१॥
चला चला पंढरपुरा । विठोबारायाच्या नगरा ॥२॥
पायीं संतांच्या लागत । पाचारितो पंढरिनाथ ॥३॥
नामा ह्मणे वेग करा ।  विठ्ठल भक्तांचा सोइरा ॥४॥

43

पूर्ण परिपूर्ण पंढरी हे पेंठ । आपन वैकुंठ समचरण ॥१॥
ऐसें कांहीं करा नाम हेंचि धरा ।  विठ्ठल अपारा जप करा ॥२॥
करितां साधन नागवी अहंकार । विठ्ठल उच्चार पुण्य ओघें ॥३॥
नामा म्हणे घेईं  विठ्ठल कुलदेवो । सर्व हाचि भावो केशव ऐसा ॥४॥

44

न पढावे वेद नको शास्त्रबोध । नामाचे प्रबंध पाठ करा ॥१॥
नव्हे ब्रह्मज्ञान न होय वैराग्य । साधा भक्तिभाग्य संत-संगें ॥२॥
येर क्रियाकर्म करितां हो कलीं । माजि कोण बळि त-रले सांगा ॥३॥
नामा म्हणे मज सांगितलें संतीं । यापरती विश्रांति आणिक नाहीं ॥४॥

45

विष्णूचें सेवन जये गांवीं पूजा । नित्य तया द्विजा समारंभु ॥१॥
घरीं वृंदावन नित्य अन्नदान । श्रीकृष्ण आपण तेथें असे ॥२॥
ऐसी ध्यानगती विष्णूचें पूजन । तयासि पतन नाहीं नाहीं ॥३॥
नाम म्हणे करा विष्णुकथा नित्य । रामनाम सत्य वचन धरा ॥४॥

46

संतांचे घरीम जाहला पाहुणेर । नामाचा वोगर वाढि-यला ॥१॥
घ्यारे ताटभरी घ्यारे ताटभरी । जेवा पोटभरी रामनाम ॥२॥
पायरव होईल दुर्जना न सांगावें । एकांतीं सेवावें म्हणे नामा ॥३॥

47

तप न करिसी जप ह्लषिकेशी । नाम अहर्निशीं राघोबाचें ॥१॥
तीर्थाचें हें तीर्थ नाम हें समर्थ । होइल कृतार्थ रामनामीं ॥२॥
साधेल साधन तुटेल बंधन । वाचे नारायण सुफल सदा ॥३॥
नामा म्हणे हरिनाम तें उच्चारी । तरीच उद्धारी इह लोकीं ॥४॥

48

व्रत तप न लगे करणें सर्वथा । न लगे तुह्मां तीर्था जाणे तया ॥१॥
आपुलेचि ठायीं असा सावधान । करा हरि-कीर्तन सर्वकाळ ॥२॥
न लगे तें कांहीं वर्जावें अन्न जीवन । लावा अनुसंधान हरीचे पायीं ॥३॥
न लगे योग याग न लगे संतत्याग । असों द्या अनुराग हरीचे पायीं ॥४॥
न लगे निरंजनीं करणें वास तुह्मां । दृढ धरा प्रेमा हरीचे नामीं ॥५॥
नामा म्हणे नाम दृढ धरा कंठीं । तेणें देईल भेटी पांडुरंग ॥६॥

49

तेहतीस कोटींची केली सोडवण । तो हा राम जपून धरा वेगीं ॥१॥
राघवाचें नाम वाचेसी उच्चारा । निजाचा सोयरा रामचंद्र ॥२॥
सागरीं ह्या शिळा तारिल्या अवलीळा । ब्रह्मयाची बाला उद्धरिली ॥३॥
रावण कुंभकर्ण विदारिले बाणीं । दिधली राजधानी शरणागता ॥४॥
वाल्मिक भविष्य कथूनियां गेला । रामें पवाडा केला तिहीं लोकीं ॥५॥
नामा म्हणे रामनाम हें दुर्लभ । शिव स्वयंभ हेंचि जपे ॥६॥

50

तप थोर देखिलें संसारीं । जो अखंड कीर्तन करी ।
त्याच्या तपा पुढारिले हरि । हें निर्धारें जाणा हो ॥१॥
धन्य धन्य विष्णुदास । ऐसा हरिनामीं सौरस ।
ते पितरांसहित वैकुंठ । सर्वकाळ क्रमिती ॥२॥
जप तप ज्ञान विठ्ठल । तयासी नाहीं काळवेळ ।
टाळी वाजवितांचि निर्मळ । महादोष हरतील ॥३॥
जेथें रामकृष्ण उच्चार । सकळ मंत्रांत मंत्रसार ।
पांचांही वदनीं शंकर । नित्य रामनाम जपतसे ॥४॥
तो हा पुंडलीकें उभा केला । आपण दृष्टिसमोर बैसला ।
कीर्तनें त्रैलोक्य तारिला । स्नानदानें पितरांसहित ॥५॥
न लगे करावे यज्ञ-भाग । न लगो आणिक मंत्रलाग ।
एक सेविलिया पांडुरंग । अनंत तीर्थें घडतील ॥६॥
पंचक्रोशी प्रदक्षिणा । नित्य नमस्कारीं विठ्ठल चरणां ।
तरी घडेल पृथ्वीप्रदक्षिण । कोटिच्या कोटी अनंत ॥७॥
सप्तपुरीं द्वादश लिंगे । कीर्तनें डोलती लागवेगें ।
ऐसे भक्त तारिले पांडुरंगें । विटेवरी उभा नीट राहोनी ॥८॥
नामा सांगे गुह्य गोष्टी । विठ्ठल तारक एक सृष्टी ।
पंढरी देखिलिया दृष्टी । वैकुंठपद पाविजे ॥९॥

51

गुरूच्या वचनें होईल पैं ज्ञान । न कळे प्रेम खूण विठोबाची ॥१॥
वेदीं हें विचारा पुराणातें पुसा । विठोबाचा कैस प्रेम भाव ॥२॥
साधकासी सिद्धि होईल पैं प्राप्ति । न कळे निरूति प्रेम खूण ॥३॥
नामा म्हणे सोडा जाणीवेचा सीण । संतांची हे खून जाणे संत ॥४॥

52

कृपेचा कोंवळा रघुनाथ दास । धरीन त्याची कास सर्वभावें ॥१॥
सांडूनि सर्व संगु होईन शरणागत । करिती मनो-रथ पूर्ण माझे ॥२॥
भवसिंधूचा पार उतरोनि निर्धारी । त्या-परती सोयरीं नाहीं सृष्टीं ॥३॥
अंतरींचें गुज सांगती श्रवणीं । अमृत संजीवनीं रामनाम ॥४॥
तेणें त्रिविधताप हरती मनींचे । जाणती जीवींचे झाले कष्टे ॥५॥
तो जीवलग जननी परिस लोभा-परु । सर्वस्व उदारु प्राणसखा ॥६॥
नामा त्याचे बळें झेलतु यमासी । रिघोनि पाठींसी केशवाच्या ॥७॥

53

प्रीति नाहीं रायें वर्जियेली कांता । परि तिची सत्ता जगावरी ॥१॥
तैसे दंभधारी आम्ही तुझे भक्त । घालूं यमदूत पा-यांतळीं ॥२॥
रायाचा तो पुत्र अपराधी देखा । तो काय आणिका दंडवेल ॥३॥
बहात्तर खोडी देवगण कंठीं । आम्हां जगजेठी नामा म्हणे ॥४॥

54

बोलवरी बोलती । श्रुति वाखाणिती ।
हरि पाविजे ती गति । वेगळी असे ॥१॥
तुज न पवे गा तें स्वप्न । हरिशब्द एकचि ब्रह्म ।
पाविजे तें वर्म । वेगळें असे ॥२॥
एक जाणीव खटपट । करिसी ते सैराट ।
हरि पाविजे ती वाट । वेगळी असे ॥३॥
एक आहेत तार्किक । चार्वाकादी बादक ।
हरि पाविजे तें सुख । वेगळें असे ॥४॥
एक चातुर्यवक्ते । व्युत्पन्न कवित्वें ।
संत रंजविते । लोका-चारी ॥५॥
जिहीं तुज जाणितलें । तिहीं मौन धरिलें ।
नामा म्हणे ते पावले । भक्तियोगें ॥६॥

55

आझां संगती नावडे कांहीं । म्हणोनि झालों बा विदेही ।
दु:खमूळ संगतीचें । आम्ही नव्हों त्या गांवीचे ॥१॥
आम्हा नाहीं रूप नांव । वस्तीची नाहीं एक ठाब ।
मग ध्या इच्छेसि धांव । आम्ही नव्हों त्या गांबींचे ॥२॥
स्नान केलें गंगा-तीरीं । गंध लविलें पंढरपुरीं ।
संध्या केली कृष्णातिरीं । आम्ही त्या नव्हों त्या गांबींचे ॥३॥
भिक्षा केली कोल्हापुरीं । भोजन केलें महाद्वारीं ।
निद्रा केली माहुरीं । आम्ही त्या नव्हों त्या गांबींचे ॥४॥
ऐसियाची संगत करीं । त्याचे चरण ह्लदयीं धरीं ।
नामा ह्मणे या संसारीं । आम्ही त्या नव्हों त्या गांबींचे ॥५॥

56

५६.
कळावंताच्या कळाकुसरी । त्या मी नेणें ना श्रीहरी ॥१॥
वारा धांवे भलत्या ठायां । तैसी माझी रंग छाया ॥२॥
प्रे-मभातें भरलें अंगीं । तेणें छंदें नाचें रंगीं ॥३॥
घातमात नेणें देवा । नामा विनवितो केशवा ॥४॥

57

भक्तिप्रतापें पावलों मी सुपंथ । सफळ निश्चित पर-मार्थ ॥१॥
देवा सर्वांभूतीं असतां प्रगट । निर्वाणीं चोखट भक्ति जाण ॥२॥
धरूनियां मनीं जपसील नाम । तेणें निजधाम पावसील ॥३॥
जप तप ध्यान न लंग साधन । भक्ति ते कारण नामा ह्मणे ॥४॥

58

माझिया मनें मज उपदेश केला । तो मज बिंबला ह्लदयकमळीं ॥१॥
निर्वाणींची एक सांगितली खून । कैवल्य चरण केशवाचे ॥२॥
वेदशास्त्र श्रुति आणीक पुराणें । पढोनि जाणणें हेंचि सत्य ॥३॥
क्रिय कर्म धर्म करणें ज्या कारणें । ते खूण निर्वाण चरण हेचि ॥४॥
जप तप अनुष्ठान करोनि साधन । प्रत्यक्ष निधान चरण हेचि ॥५॥
नामा ह्मणे मज कळलें अनुभवें । न विसंबें चरण जीवें तुझे ॥६॥

59

धरीं नांदतो बरवेपरी । म्हणूनि केलीसे अंतुरी ।
नित्य भांडण तया वरीं । आणिक कांहीं न देखों ॥१॥
दुसरी न करावी बाईल । भंड फजिती होईल ।
बोभाट वेसदारा जाईल । बायकाच्या पाणवथ्या ॥२॥
धाकटीकडे पाहतां कोडें । वडील धडधडा रडे ।
मेल्या तुझें गेलें मढें । तिकडे कांरे पहातोसी ॥३॥
वडील बाईल म्हणे उण्या । धाकटी बाईल केली सुण्या ।
लाज नाहीं तुझ्या जिण्या । काळतोंड्या बैसलासी ॥४॥
वडील बाईल धरी दाढी । धा-कटी ओढून धरी शेंडी ।
सांपडलासी यमझाडी । लाशीपरी पड-लाशी ॥५॥
सवती सबतीचा करकरा । उभा शिणलों दातारा ।
भेटी करी बनींच्या व्याघ्रा । परी संसारा उबगलों ॥६॥
सवती सबतीचा कैशी धरणी। कौतुक पहाती शेजारिणी ।
तया पुरुषाची विटंबनी । थोर जाचणी तयाशी ॥७॥
नामा ह्मणे गा श्रीहरी । दोघी बायका ज्याचे घरीं ।
त्याचे नसावें शेजारीं । थोर दु:ख तयाशी ॥८॥

60

संसार सागरींरे । माझें माहेर पंढरपुरीं ॥
विठोबा बाप माझा । माता रखुमाई सुंदरी ॥१॥
पुंडलिक भाऊ माझा । तोही नांदे बरव्यापरी ॥
सासुरें दुर्बळ भारी । मज मोकलिलें दुरी ॥२॥
सुख दु:ख कवणा सांगूं । माझें माहेर पंढरपुरीं ॥ध्रु०॥

भ्रतार निष्ठुर बो । काम क्रोध दोघे दीर ॥
आशा हे सासू माझी । ते मज गांजितसे थोर ॥३॥
तृष्णा हे नणंद सखी । तिनें व्यापियेले घरीं ॥
भक्ति हे माझी बहिणी । ते मज होईल निर्धारीं ॥४॥
वर्ष महिने दिवस घडिया । बाट पाहे अझुमी ॥
देहामाजी करिती देखा । न्यावया न पवे कोणी ॥५॥
गजेंद्र हरिश्चंद्र त्यासी । सोडावया आला ।
प्र-र्‍हाद अंबऋषि । तिहीं तुझा धांवा केला ॥६॥
उपमन्यु दूध मागतां । क्षीरसागरु दिल्हा ॥
गजेंद्र अजामेळ त्यांच्या सत्वा तूं पावला ॥
नामया विष्णुदास गीतीं गोविंदु गाइला ॥७॥

61

मी माझें ह्मणतां अर्थ जोडितां साही चक्र गेले ।
नळ नीळ मांधाता पुरुषार्थीं सारिखे तेही काळें पासीयले ।
कपील म-हामुनी सिद्ध विचारितां सगररायें पै भंगा गेले ।
कुभार अंत: पूर सांडूनियां ते भक्तराज काय झालेरेरे ॥१॥
संसार स्वप्र जाणूनियां शरण रिघे पंढरीरायारेरे ॥ध्रु०॥
दुंदुभिरायें धर्म चालविला तेणें शांतीचा सागर ह्मणविलें ।
अजपाळ जैपाळ राजा दशरथ सूर्यवंशीं ते जन्मले ।
जळींचे तरंग जळींच निमाले नेणो तेथें काय झालें ।
राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सांगपां ते काय झालेरेरे ॥३॥
सूर्यवंशीं राजा हरिचन्द्र जन्मला स्वप्न तेणें काय साच केलें ।
स्त्रीपुत्रातें विकूनियां तेणें ब्राह्मणा सुखीया पैं केलें ।
शिभ्री चक्रवर्तीनें आपुलें प्राण देउनी जीव ते भक्तराज काय झालेरेरे ॥४॥
शरीराचें मुद्नलें सामास कवण वेंचि ऋषि भोजनासी आले ।
स्त्रीपुत्रातें वं-चूनियां तेणें अतीता सुखे केलें ।
सत्व पहावया कैलासींचा राणा कां-तीपूरनगरी उजू ठेले ।
श्रीयाळें पोटींचें बाळक दिधलें सांगपां तें काय झालेरेरे ॥५॥
कौरवां पांडवां अति दळ संग्राम अठरा अक्षौहिणी रणासी आले ।
नव वेळ नारायण आले गेले परी अकरा रुद्न गणतीसी आले ।
छपन्नकोटी यादवेंतीं कृष्ण भालुका तीर्थीं निमाले ।
नामा ह्मणे ऐसे कल्पनेचे अवघे परंपरी भजिन्नले ॥६॥

62

तत्वमसी वाक्य उपदेशिलें तुज । तें तूं जीवीं कां अझून धरिसी दुर ॥ध्रु०॥
त्रिभुवनापरता धांवतोसी दुरी । आधीं तूं आपुली शुद्धि करी ।
उदय अस्तु झाला कवणीये घरीं । पिंडा माझारीं पोहेपां ॥१॥
जागृतीमध्यें कवण जागतें । दोहीं माजीं स्वप्न कोण देखतें ।
सुषुप्तीमध्यें कोण नांदतें । मग अनुवादतें तें कवण ॥२॥
जागृती वरोनी करीं चिंतन । सुषुप्तीमाजीं रीघे ज्ञान ।
दोन्हीं माजीं स्वप्न देखे कवण । जीव कीं मन सांगपां ॥३॥
निद्रा मरण हें एक स्थान । दोहींचा देखणा जाणें आपण ।
लहान सुईंच्या इंधनाहून । आढळले मन पांचासीं ॥४॥
इंद्रियें चपळ चेइलीं । जागत होती ती कां परतलीं ।
जाऊनियां कवणा घरीं लपालीं । मना मिळालीं कवणें गुणें ॥५॥
सांगतां तेथें अनुवाद कैंचा । नाहीं तूं पण खुंटली वाचा ।
विष्णुदास नामा बोलिला साचा । परम पदीं बैसलासे ॥६॥

63

चेईला तो जाणरे सद्‍गुरुवचनीं निर्धारें ।
विपरीत भावना विसर पडिला कंठीं जया परिहाररे ॥१॥
आपणा पैं पहा- वया कवण लावूं दिवारे ।
चंद्र सूर्य जेणें प्रकाशें तो मीं कैसा पाहूं येईं रे ॥२॥
अंत त्यासी नाहीं रे स्थान मान कांहीं रे ।
चेईला तेणें ओळखीला येरासी अगम्य भाईरे ॥३॥
पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर नाहीं दाही दिशा रे ।
महाप्रळयीं सप्त सागर एक होती अनुभविया तो तैसारे ॥४॥
दाही दिशा व्यापूनियां तो अंधकार महारे ।
रवि प्रकाश जाहल्या आपेआप निरसलारे ॥५॥
काष्ठीं पावक उपजला तोही तया समरे ।
नामा ह्मणे केशी-राजा चेईल्या आह्मां तुझीरे ॥६॥

64

गुरुराव गुण गंभीरवो वावो चैतन्य प्रकाशु ।
योगी सहज सुकामिनी विलासु ॥ध्रु०॥
चिदानंदधनु तनु सांवळावो हरि पाहातां निवती लोचन ।
तनु मन चरणीं वो गुंतलीं नाम गोपा-ळाचें अमृत समान ॥१॥
पितांबरशोला माळ कंठीं या रावो गो-पाळा ।
मुगुटीं झळाळ सर्वांगीं कस्तुरीचेम विलेपन कटीं रुळे वनमाळा ॥२॥
येणोंचि जन्में पाविजे गोपाळासी आनु सार ।
श्रीवत्सलांछन हेचि खुण विष्णुदास नामयादातार ॥३॥

  • मुख्य पृष्ठ : संपूर्ण काव्य रचनाएँ : संत नामदेव जी
  • मुख्य पृष्ठ : हिन्दी कविता वेबसाइट (hindi-kavita.com)