संत नामदेवांचे अभंग जनांस उपदेश

Janans Updesh : Sant Namdev Ji

जनांस उपदेश
1

देवा धर्मीं नाहीं चाड । त्यासि पुढें आली नाड ॥१॥
जैसें डोंगरींचें झाड । त्याचें जन्म झालें । वाड ॥२॥
नामा म्हणे भक्ति गोड । स्वानंद नेणती ते मूढ ॥३॥

2

पावावया ब्रह्मपूर्ण । सांडूनि देईं दोषगुण ॥१॥
सर्वांभूतीं समदृष्टि । हेचि भक्ति गोड मोठी ॥२॥
यावेगळें थोर नाहीं । बरवें शोधूनियां पाहीं ॥३॥
येणें संसार सुखाचा । ह्मणे नामा शिंपीयाचा ॥४॥

3

ज्यालागीं जोडिसी ते न येती तुजसरसीं । यम कासाविसी करी तये वेळां ॥१॥
तूं तरी अज्ञान न देखसी डोळा । झालसि गोठोळा धनगरांसी ॥२॥
चिरीरी घेतो सांपडलिया हातीं । अवधी त्याची पळती टाकोनियां ॥३॥
संतीं न म्हणावें वचन निषुर । वेगीं ठाका द्बार केशवाचें ॥४॥
नामा म्हणे शरन रिघा हरि पायीं । तया शेषशायी न विसंबे ॥५॥

4

विषयांचे कोड कां करिसी गोड । होईल तुज जोड इंद्रियबाधा ॥१॥
सर्व हें लटिकें जाणूनि तूं निकें । रामेंविण एके न सुटिजे ॥२॥
मायाजाळमोहो इद्रियांचा रोहो । परि न धरिसी भावो भजनपंथें ॥३॥
नामा ह्मणे देवा करी तूं लवलाहो । मयूरचा टाहो घन गर्जे ॥४॥

5

लव निमिष म्हणतां आहे नाहीं पाहतां । क्षण एक संपादितां विषयो हा ॥१॥
स्वहित तें आचरा हित तें विचारा । नामीं भाव धरा जाणतेनो ॥२॥
संपत्तीचे बळें एक जहाले आंधळे । वेढिलें कळिकाळें स्मरण नाहीं ॥३॥
एक विद्यावंत जातीचा अभि-मान । ते नेले तमोगुणें रसातळां ॥४॥
मिथ्या मायामोह करूनि हव्यास । वेंचिलें आयुष्य वांयांविण ॥५॥
नामा म्हणे कृपा करूनि ऐशा जीवा । सोडवीं केशवा मायबापा ॥६॥

6

चांदणें नावडे चोरा । सद्‍बुद्धि नावडे रांडेच्या पोरा ।
वृक्ष नावडे कुंजरा । सत्य कुचरा नावडे ॥१॥
चंदन जाणावा सुगं-धाची धृति । कर्पूर जाणावा उत्तम याति ।
हंस जाणावा चालतिये गति । कोकिळ श्रुति ओळखावी ॥२॥
लांव जाणावी उफराटिये दृष्टी । क्रोधी जाणावा भोंवयांसीं गांठी ।
लटिक्या जाणा बहुता गोष्टी । नष्ट कुचेष्ठी ओळखावा ॥३॥
नारी जाणावी भ्रतारभक्ति । आचारें जाणावी महा सति ।
धनुर्धर जाणावा संधान युक्ति । संत तापसीं ओळखावा ॥४॥
जयीं घातलिया निघे खरा । ज्ञान जाणे तोचि च-तुरा ।
शिंदळी जाणावी नीच उत्तरा । कुसळी घरोघरा फिरतसे ॥५॥
इतुकिया बोलाची न मानावी खंति । विठ्ठलचरणीं ठेवूनियां मति ।
प्रसन्न होईल लक्ष्मीपति । ह्मणे विष्णुदास नामा ॥६॥

7

देह पडे तंव देहाचा अभिमान । परि न करी अज्ञान आत्महित ॥१॥
मी माझें म्हणतां गेले नेणों किती । रंक चक्रवर्ति असंख्यात ॥२॥
क्षणक्षणा देह आयुष्य पैं काटे । वासना ते वाढे नित्य नवी ॥३॥
मोहाचीं सोयरीं मिळालीं चोरटीं । खाऊनि शेवटीं घर घेती ॥४॥
जोंवरी संपत्ति तंववरी हे सखें । गेलीया तें भुंके सुणें जैसें ॥५॥
नामा म्हणे केशवा मी तों तुझा दास । मज आहे विश्वास तुझ्या नामीं ॥६॥

8

भुलले हे लोक काळाचें कौतुक । सुरशक्रादिक पाह-ताती ॥१॥
देवा तुझी माया अगम्य अगाध । प्रपंचाचा वेध सुटों नेदी ॥२॥
माझें घरदार माझा संसार । मी मोठा चतुर ह्मणोनियां ॥३॥
आपणा देखतां जाती तें पाहती । मीपणाची भ्रांति सुटों नेणे ॥४॥
नामा ह्मणे आतां काय म्यां बोलावें । भोंवत असावें चौर्‍यांशीला ॥५॥

9

विषय सेवितां तुज । नव्हे पुढील काज ।
कदा न भेटे तुज । गरुडध्वज निश्चयेंसी ॥१॥
काय करिसी खटपत । वांयां मार्ग दुर्घट ।
वरपडा होसील कष्ट । परि संसार न सुटेचि ॥२॥
सुट-केचें मूळ जाण । रामकृष्ण नारायण ।
येणें तुटेल भवबंधन । जन्मा न येसी सर्वथा ॥३॥
साधन इतुकेंचि पुरे । न लगती मंत्रांचे भार ।
ते बुडविती साचार । परि तरों न देती ॥४॥
नामा म्हणे ते पामर । नेणतीच हा मार्ग सार ।
परि वाचे नाहीं उच्चार । तो जाणावा महादोषी ॥५॥

10

मायेचा हा फांसा अहंकार वळसा । परि ह्लषिकेशा भजतीना ॥१॥
नव्हे हे सुटिका हा बोल लटिका । केशवासी एका न भजकारें ॥२॥
होतील त्यां मुक्ती पुरतील त्यां आर्ती । चरण हे चिंतीं विठ्ठलाचे ॥३॥
नामा ह्मणे केशव सर्वांभूतीं देव । ऐसा धरीं भाव भजनशीळ ॥४॥

11

कांरे तूं शिणतोसि घरदार बंधनें । वांयांचि व्यसनें आणितोसी ॥१॥
भजें यादवराया लागें त्याच्या पायां । आणिक उपायां करूं नको ॥२॥
सर्वभावें हरिभजन तूं करी । भक्ति दे पुढारी तारीक सत्य ॥३॥
नामा ह्मणे दया मांडी सोडीं माया । भजन लवलाह्या हरीचें करीं ॥४॥

12

वासनेचा त्याग करारे सर्वथा । या भावें अनंता शरण जावें ॥१॥
कृपेचा सागर नुपेक्षी निर्वाणीं । कलिकाळाहूनि सोडविलें ॥२॥
भक्ताचा पाळक अनाथाचा कैवारी । ब्रिदें चराचरीं वर्णि-ताती ॥३॥
शरीरसंपत्तीचा सोडा अभिमान । मन करा लीन कृष्ण-रूपीं ॥४॥
आसनीं शयनीं चिंतितां गोविंदु । तेणें तुटे कंदु भव-व्याधि ॥५॥
परदारा परदासांचे पीडन । सांडूनि भजन करा त्याचें ॥६॥
करा सर्वभावें संतांची संगति । नाहीं अर्थाअर्थीं जन्मा येणें ॥७॥
शुकसनकादिक प्रल्हाद जनक । परीक्षिती मुख्य बिभिषण ॥८॥
भीष्म रुक्मांगद नारद उद्धव । शिबि कवि देव इत्यादिक ॥९॥
शास्त्रांचें हें सार वेदां गव्हार । नाम परिकर कलियुगीं ॥१०॥
नामा म्हणे नको साधन आणिक । दिल्ही मज भाक पुंडलिकें ॥११॥

13

पहा परदारा जननिये समान । परद्रव्य पाषाण म्हणोनि मानी ॥१॥
निदेसी तूं मुका होऊनि तत्त्वतां । परद्वेषीं निरुतां न घालीं दृष्टि ॥२॥
ऐसें दृढ मनीं धरूनि राहसी । तरी माझें पावसी निजपद ॥३॥
पराकारणें प्राण वेंचि जो सर्वथा । जाणे परव्यथा कळवळोनि ॥४॥
परसुख संतोष धरी जो मानसीं । जरी परलो-कासी जाणें आहे ॥५॥
देहाचा अभिमान न धरावा चित्तीं । धरावी उपरति उपशमु ॥६॥
सर्वकाल प्रीति संतांचि संगति । गावीं अनु-रागें प्रीति नामें माझीं ॥७॥
सर्वांभूतीं सर्वदा ऐसी समबुद्धि । सांडावी उपाधि प्रपंचाची ॥८॥
सर्वकाळ परमात्मा आहे सर्वदेशीं । हे भावना अहर्निशीं दृढ धरीं ॥९॥
संतसमुदाय मिळती जेथें जेथें । जावें तेथें तेथें लोटांगणीं ॥१०॥
चिंता न करीं नाम्या येणें तरसी जाण । तुज सांगितली खूण निर्वाणींची ॥११॥

14

संग खोटा परनारीचा । नाश होईल या देहाचा ॥१॥
रावण प्राणासी मुकला । भस्मासुर भस्म झाला ॥२॥
गुरुपत्नीशीम रतला । क्षयरोय त्या चंद्राला ॥३॥
इंद्रा अंगीं सहस्र भगें । नामा म्हणे विषयासंगें ॥४॥

15

लावण्य सुंदर रूपानें बरवी । पापीण जाणावी ते कामिनी ॥१॥
देखतां होतसे संगाची वासना । भक्ताच्या भजना नाश होये ॥२॥
ऐसी जे घातकी जन्म कासयाची । चांडाळीन तिसी नरकप्राप्त ॥३॥
नामा म्हणे तिचें पाहूं नये तोंड । पापीण ते रांड बुडवी नरा ॥४॥

16

कायारूप जिचें हिनवट अती । माउली धन्य ती आहे नारी ॥१॥
तियेवरी मन कदापी नव जाये । भजना न होये कदाचळ ॥२॥
ऐसिये माउली परउपकारी । घात हा न करी भज-नाचा ॥३॥
नामा म्हणे तिचे चरण वंदावे । वदन पहावें माउलीचें ॥४॥

17

परदारा परधन परनिंदा परपीडण । सांडोनियां भजन हरिचें करा ॥१॥
सर्वांभूती कृपा संतांची संगति । मग नाहीं पुन-रावृत्ति जन्ममरण ॥२॥
शास्त्रांचें हें सार वेदांचें गव्हार । तें नाम परिकर विठोबाचें ॥३॥
नामा ह्मणे नलगे साधन आणिक । दिधली मज भाक पांडुरंगें ॥४॥

18

धीर धरीं सत्य हें तो नारायणा । शुद्ध आचरणां न सांडावें ॥१॥
लैकिकाची कांहीं न धरावी लाज । हेंचि निज काज साधावें तें ॥२॥
दंभ अभिमान सर्व त्यजोनियां । शरण त्या स-खीया जावें आतां ॥३॥
निंदा करिती तो मानावा आदर । स्तुति तें उत्तर नायकावें ॥४॥
न धरावी चाड मानासन्मानाची । आवडी भक्तीची रूढवावी ॥५॥
नामा ह्मणे हेंचि रूढवावें मानसीं । क्षण एक नामासी विसंबूं नये ॥६॥

19

अंतींचा लाभु आधींच साधिजे । देह असता कीजे हरिभक्ती ॥१॥
आदि मध्य अंतु तोचि हा व्यापकु । विश्वप्रतिपा-ळकु नारायण ॥२॥
विषय महापुरीं पतीत जीव भारी । तैशापरीहि हरिनाम ध्यावें ॥३॥
नामा ह्मणे हा दुर्लभ नरजन्मु । केशव मे-घश्यामु अनुसरा वेगीं ॥४॥

20

जंव हंस काया नव जाय सांडोनी । तंव घेईं ठाकोनि रामनाम ॥१॥
अंत काळवेळीं तुझें नव्हे कोण्ही । मी माझें ह्मणवूनि भु-ललासी ॥२॥
राहें निरंतर राघवाचे द्वारीं । तेणें भवसागरीं तरसी बापा ॥३॥
नवमास मायें वाहिलसि उदरीं । आस केली थोरी होशी ह्मणोनी ॥४॥
स्तनपान देऊनि मोहें प्रतिपाळीं । तेहि अंतकाळीं दूर ठाके ॥५॥
सर्वस्व स्वामिणी ह्मणवीतसे कांता । तेहि केश देतां रडतसे ॥६॥
ह्मणे म्यां मेल्याचें सुख नाहीं देखिलें । तेणे तंव पाळिलें अर्थें प्राणें ॥७॥
गाई घोडे ह्मैसी आणिक त्या दासी । धन त्वां सा-यासीं मेळविलें ॥८॥
तुझिया धनाला नाही पार लेखा । एकलचि मूर्खा जासी अंतीं ॥९॥
हातींच्या मुद्रिका कानींचे ते नग । करोनि लगबग काढिती वेगीं ॥१०॥
अंगींचीं लुगडीं फेडोनियां घेतीं । तुज बांधोनियां नेती यमदूत ॥११॥
भूमिभार झाला ह्मणती वेग करा । नातळती श-रीरा इष्ट मित्र ॥१२॥
स्मशाना नेऊनि भडाग्नि देऊनि । येती परतोनी सकळ जन ॥१३॥
एकलेंचि येणें एकलेंचि जाणें । पहा दृढ ज्ञानें विचारोनी ॥१४॥
पापपुण्य दोन्ही अंतींचीं सांगाती । येरें तीं राहती जेथिंचीं तेथें ॥१५॥
ऐसा हा संसार माया वेष्टियला । ह्मणोनि दुर्‍हाविला योगीजनीं ॥१६॥
विष्णुदास नामा विनवीतसे तुह्मां । झणीं परब्रह्मा विसरूं नका ॥१७॥

21

अवचट देह लाधला प्राणिया । भक्तिवीण वांयां गेला जाण ॥१॥
धिक्‍ त्याचें जिणें जन्मला कासया । जरी पंढरिराया विसरला ॥२॥
रामनामीं रत नव्हेचि बापुडें । जननिये सांकडें घातलें तेणें ॥३॥
ऐसा जन्म नको नको गा श्रीरामा । ह्मने तुझा नामा विष्णुदास ॥४॥

22

जड हेंचि खळे आयुष्याची रासी । काळ माप रसी मवीतसे ॥१॥
माप तें लागलें माप तें लागलें । मात तें लागलें झडा झडा ॥२॥
मनोमय साक्ष माणिकाप्रमाणें । तूंचि नारायण काळ खंडी ॥३॥
नामा ह्मणे जावें शरण केशवा । सळेचा जो ठेवा न पवसी ॥४॥

23

अतिथी आलिया द्यावें अन्नदान । अर्पीं जीव प्राण परमार्थीं ॥१॥
तोचि एक नर श्रीहरिसमान । करी दुजा कोण नाहीं ऐसा ॥२॥
दीनासी समान करितां आदर । त्याच्या उपकारा पार नाहीं ॥३॥
नामा ह्मणे असे खूण हे भाविकां । सर्वामभूतीं देखा पाहे ऐक्य ॥४॥

24

भूमिदानें होसी भूमिपाळु । कनकदानें कांति निर्मळु ।
चंदनदानेम सदा शीतळु । जन्मोजन्मीं प्राणिया ॥१॥
अन्नदाने दृढा-युषी । उदकदानें सदासुखीं ।
मंदिरदानें भुवनपालखी । सुपरिमळू उपचारां ॥२॥
वस्त्रदानें सुंदरपण । तांबूलदानें मनुष्यपण ।
गोपी-चंदनें ब्राह्मणपण । अतिलावण्य सुंदरता ॥३॥
जे वृक्ष लविती सर्वकाळ । तयावरी छत्रांचें झल्लळ ।
जे ईश्वरीं अर्पिती फळ । नाना-विध निर्मळ ॥४॥
ऐशा दानाचिया पंक्ति । वेगळाल्या सांगों किती ।
एका ध्यारे लक्ष्मीपति । विष्णुदास ह्मणे नामा ॥५॥

25

एकी एकादशी करितां काय वेंचे । उपवासी राहतां काय वेंचे ॥१॥
एक तुळसीदळ वाहतां काय वेंचे । पाउलीं वंदितां काय वेंचे ॥२॥
तुज जागरणा जाणां काय वेंचे । हरिहरि ह्मणती काय वेंचे ॥३॥
संतसमागमा जातां काय वेचें । चरणरज वंदितां काय वेंचे ॥४॥
एक दंडवत करितां काय वेंचे । अपराधी ह्मण-वितां काय वेंचे ॥५॥
एक प्रदक्षिणा करितां काय वेंचे । तीर्थया- येसी जातां काय वेंचे ॥६॥
ऐसी निमाली भक्ति कां न करिसी निर्दैवा । नामा ह्मणे केशवा अनुसर पां ॥७॥

26

एकादशी दिनीं खाईल जो अन्न । सूकर होऊनि येईल जन्मा ॥१॥
एकादशी दिनीं करील जो भोग । त्यासी माता संग घडतसे ॥२॥
एकादशी दिनीं खेळेळ सोंगटी । काळ हाणील खुंटी गुदस्थानीं ॥३॥
रजस्त्री शोणीत सेविल्या समान । तांबुल चर्वण करील जो ॥४॥
नामा ह्मणे नाहीं माझ्याकडे दोष । पुराणीं हें व्यासवाक्य आहे ॥५॥

27

निंदील हें जन सुखें निंदू द्यावें । सज्जनीं क्षोभावें नये बापा ॥१॥
निंदा स्तुति ज्याला समान पैं झाली । त्याची स्थिति आली समाधीला ॥२॥
शत्रुमित्र ज्याला समसमानत्वें । तोचि पैं देवातें आवडला ॥३॥
माती आणि सोनें ज्या भासे समान । तो एक निधान योगीराज ॥४॥
नामा ह्मणे ऐसे भक्त जे असती । तेणें पावन होती लोक तिन्ही ॥५॥

28

भवसागर तोडितं कं रे करितसां चिंता । पैल उभ दाता पांडुरंग ॥१॥
निजाचें जें पीठ सोडूनि वैकुंठ । येथें वाळवंट आवडलें ॥२॥
देव गुज सांगे पंढरीसि यारे । प्रेमसुख घ्यारे नाम माझें ॥३॥
तारीन भवसिंधु घ्यारे माझी भाक । साक्ष पुंडलीक करूनि सांगे ॥४॥
काया वाचा मनें दृढ धरा जीवीं । मी त्याचा चालवीं भार सर्व ॥५॥
हें जरी लटिकें नामया पुसा । आहे त्या भरंवसा नामीं माझे ॥६॥

29

एक तत्त्व त्रिभुवनीं । दुसरें न धरी तूं मनीं ॥१॥
म्हणे कां नरहरी नारायण । मग तुज गांजील कोण ॥२॥
दोन मनीं जरी तूं धरिसी । तरी वांयां दंडिला जासी ॥३॥
त्रिविध भक्ति चराचरीं । तयामाजिल एक तूम करीं ॥४॥
चहूंवेदीं जें बोलिलें । तें तूं करीं बा उगलें ॥५॥
पंचइंद्रियांचा संग । त्यांचा नको करूं पांग ॥६॥
साहि चक्रीं मन पवन । तेथें नव्हे आत्मनिधान ॥७॥
सप्तस्वरीं करीं कीर्तन । आणिक न लगेरे साधन ॥८॥
अष्टहि गुणीं सात्विक पूजा । भावें भजा गरुडध्वजा ॥९॥
नवहि द्वारें दंडिती । पुनरपि कोठें कैंचि भक्ती ॥१०॥
दाही दिशा अवलेकितां । दिवस गेले मोजितां ॥११॥
अकरा रुद्र जाले जरी । तरी एकचि श्रीहरि ॥१२॥
बारा मास आणि पक्ष । व्यर्थ जाती दे तूं लक्ष ॥१३॥
तेरा गुणांचे तांबूल । समर्पावें पूगीफळ ॥१४॥
चौदा भुवनें ज्याचे पोटीं । त्याचें नाम विचरा कंठीं ॥१५॥
पंधरा दिवसां एकादशी । करा जागर उपवासी ॥१६॥
षोडश उपचारें पूजा । भावें भजा गरुडध्वजा ॥१७॥
सत्रावी जीवनकळा । तिचा घे कां रे सोहळा ॥१८॥
अठरा पुराणें वाणिती । निरंतर कृष्ण कीर्ति ॥१९॥
म्हणे विष्णुदास नामा । शरण जावें पुरुषोत्तमा ॥२०॥

30

हरिनामीं उदास तो पतित निष्ठुर । तया यमकिंकर गांजितील ॥१॥
तोचि हरिचा दासु नामीं । ज्या विश्वासु । तया गर्भवासु नाहीं नाहीं ॥२॥
मार्ग सांडोनियां आडमार्गें जाती । ते व्याघ्रा वरपडे होती क्षणामाजी ॥३॥
नामा म्हणे जिंहीं नामीं आ-ळस केला । तो येवोनि गेला व्यर्थ एक ॥४॥

31

रामनाम म्हणतां संसाराचें भय । म्हणती त्याच्या होय जिव्हे कुष्ट ॥१॥
अमृत सेवितां कैंचेम ये मरन । जाणती हे खूण अनुभवी ॥२॥
ज्याची एकवृत्ति रामनामीं प्रीति । असतां कैसे होती गर्भवास ॥३॥
नामा म्हणे नामीं दृढ भाव धरा । आत्म-हित करा जाणते हो ॥४॥

32

दिशा फेरफेरे कष्टशील सैरा । किती येरझारा कल्प-कोटी ॥१॥
विठ्ठलाचे नामीं दृढ धरीं पाव । येर सांडीं वाव मृग-जळा ॥२॥
भक्ति भक्ति सिद्धि जोडोनियां कर । करिती निरंतर वोळगण ॥३॥
नामा म्हणे जना मानी पैं विश्वास । मग तुज गर्भ-वास नव्हे नव्हे ॥४॥

33

सांडीं सांडीं पसारा विषयाचा चारा । विठ्ठल मोहरा वोळंगे वेगीं ॥१॥
होईल तुझें हित होसिल पूर्ण भरित । सर्वांभूतीं हित हेचि दया ॥२॥
वोळंगे विठ्ठलरूपा मार्ग हाचि सोपा । विष-याच्या खेपा तुटतील ॥३॥
नामा म्हणे केवळ आह्मां नित्य काळ । दिननिशीं पळ विठ्ठल देव ॥४॥

34

व्यर्थ कां हव्यासीं करिसी परोपरी । नाम निरंतरीं न म्हणा कां रे ॥१॥
आयुष्य जाईल क्षणांत सरोन । पावसी पतन कुंभिपाकीं ॥२॥
नाम संकीर्तन नाइके स्वभावें । प्रत्यक्ष तें शव ज-गामाजीं ॥३॥
नामा ह्मणे ऐसे गेले बहुतेक । सांगें सकळिकां हेंचि आतां ॥४॥

35

भूषक हव्यासें चालूनि भूमीतेम । मांजर तयातें टप-तसे ॥१॥
तसा तुज काळ टपे वेळोवेळां । वेगीं त्या गोपाळा भजावें बापा ॥२॥
भानुचेनि माप आयुष्य वो सरे । अवचितां कांरे डोळा झांकी ॥३॥
नामा म्हणे अरे निश्चिती हे मूढा । हरी नाम दृढा सेवीसीना ॥४॥

36

पवित्र आणि परिकर । उभविलें मंदिर । दीपेंविण मनोहर । शोभा व पवे ॥१॥
श्यामअंगीं तरुणी । सुंदर होय रम-णी । पुरुषाविण कामिनी । शोभा न पवे ॥२॥
द्रव्यावि ण नर । जरी जाहला सुंदर । तो त्यावीण चतुर । शोभा न पवे ॥३॥
गिया आणि कठीन । इंद्रिया नाहीं दमन । षट्‍कर्मेंविण ब्रह्मज्ञान शोभा न पवे ॥४॥
नामा ह्मणे सुंदरा । रखुमादेवीवरा । तुजविण दातारा । शोभा न पवे ॥५॥

37

निरंतर तुह्मीं करावा विचार । भवाब्धीचा पार होय कैसा ॥१॥
जन्म गेलें वांयां विषयाचे संगें । भुलले वाउगे माया मोहें ॥२॥
अवघा करितां संसाराचा धंदा । वाचे वदा सदा हरि-नाम ॥३॥
सर्वभावें एका विठोबातें भजा । आर्ते करा पूजा हरि भक्त ॥४॥
सर्व सुख होई तुह्मांला आपैतें । न याल मागुते गर्भवासा ॥५॥
नामा ह्मणे तुह्मीं विचारूनि पहा । सर्वकाळ रहा सतसंगें ॥६॥

38

न फिटे हें ओझें मायेचा गुंडाळा । एका तूं गोपाळा शरण जाईं ॥१॥
तुटेल बिरडें सुटेल हा मोह । केशवींच भाव असों देणें ॥२॥
कईंचे हे क्लेश उदासीन वांया । भजणें यादवराया हेंचि सत्य ॥३॥
नामा ह्मणे सुफळ भजनचि करीं । सर्वांभूतीं हरि भजनभावो ॥४॥

39

कल्मष हरती जयाचेनि नामें । तें विसरोनि काय करावें ॥१॥
संसारतारक विसांवा हरि । गर्भवास चुकवी तो मुरारि ॥२॥
बाह्या उभारोनि घेतां राम नामा । वैकुंठींचा देव केशव परमात्मा ॥३॥

40

उदास भरण खळ बुद्धीसि कारण । त्याचें परिहरण रामनाम ॥१॥
कामसंदीपन दोषआचरण । त्याचें परिहरण रामनास ॥२॥
दुर्वासना गहन दुर्बुद्धि आचरण । त्याचें परिहरण रामनाम ॥३॥
नामा ह्मणे कारण संसारतारण । जरी मनीं निधान रामनाम ॥४॥

41

देवो देवो बोले तूम जीवन भातें । मेहुडें दुभतेम जना यया ॥१॥
तैसें मना करा भजनभाव धरा । विषयपसारा टाका वेगीं ॥२॥
उपावो न लगे दया ते धरावी । आपुली ह्मणावी माय जगीं ॥३॥
नामा ह्मणे बाप विठ्ठल तो आमुचा । कुळदेव साचा पुरातन ॥४॥

42

विठ्ठलाचे पाय धरूनियां राहें । मग संसार तो काय करील तुझें ॥१॥
संसाराचें भय नाहीम हरिचे दासा । विठु आह्मां सरिसा निरंतर ॥२॥
निरंतर वसे हरि भक्तापासीं । विसंबेना त्यासी कदाकाळीं ॥३॥
नामा ह्मणे ऐसा विठ्ठल सोडोनी । व्यर्थ काय जनीं शिणताती

43

स्वप्नींचिया परी देखिसी अभ्यास । न धरीच विश्वास चित्त तुझें ॥१॥
वांझेचिया स्तनीं अमृताची धणी । मृगजळ पाणी तान्हा बोले ॥२॥
तरी प्रेमावीण फळती क्रियाकर्म । हातां येतीं वर्में विठोबाचीं ॥३॥
दृष्टीतें देखणें श्रवणीं ऐकणें । मनाचें बैसणें एक होय ॥४॥
नामा ह्मणे तरीच विठो येऊन भेटे । कावळ पालटे कैवल्य होय ॥५॥

44

गौळियाचे घरीं कैवल्याचे दानी । परब्रह्म अंगणीं कीडतसे ॥१॥
ऐसें कांहीं करा आलेनो संसारा । जेणें जोडे सोईरा पांडुरंग ॥२॥
करितां त्याचें काज मनीं न धरीं लाज । ह्मणे हे शरण मज सर्वभावें ॥३॥
राखे बळिचें द्वार पाहे त्याची वास । ह्मणे हा माझा दास अंतरंगु ॥४॥
गौळियांचें उच्छिष्ट मनीं न धरि वीट । आवडी निकट गोपाळांची ॥५॥
तरी क्रिया कर्म केलें होय सफळ । जरी ह्लदयीं गोपाळ येऊनि राहे ॥६॥
येरी ते मायावी जग भुलवणीं । नित्य विभांडणी सर्वभावें ॥७॥
नाभा ह्मणे ऐसे संतांचिये सोई । विठोबाचे पायीं मन ठेवीं ॥८॥

45

सर्व जिवां करी कारुण्य । वाचे सत्य उच्चारण ।
नित्य नामस्मरण । तोचि दास भगवंताचा ॥१॥
धन्य धन्य भूमंडळीं । धन्य धन्य साधुवचन पाळी ।
वेदमर्यादा वेगळी । कार्येम न करी सर्वथा ॥२॥
प्रात:काळीं उठुनी । नरहरिनाम उच्चारूनि ।
उभा राहूनि कीर्तनीं । जय जय नामें गर्जतसे ॥३॥
देवभक्ति आवडे ज्यासी । पुण्यप्रारब्ध ह्मणती त्यासी ।
जो उपजोनि आपुले बंशीं । पूर्वजांसि उद्धरितो ॥४॥
तीर्थें एक भावभजन । नित्य नित्य तें पिंड-दान ।
भूतदया तें भागीरथी स्नान । तेथ जनार्दन उभा असे ॥५॥
देखिलिया ब्राह्मण । वेदांसमान देत मान ।
यथाशक्ति करूनि दान । अतिथिपूजन जो करी ॥६॥
नामा म्हणे तोचि तरे । वैकुंठ तेथें उतरे ।
तीर्थें ह्मणती तो त्वरें । पाहों दृष्टी एकवेळा ॥७॥

46

ब्रह्म ते ब्राह्मण श्रुतीचें वचन । सर्व नारायण सर्वां-भूतीम ॥१॥
चहूम शिक्षा जनीं गुरु चालू वर्ण । प्रत्यक्ष पुराणें साक्ष देती ॥२॥
हेळसुनी निंदी दुरावी ब्राह्मणा । सभेमाजी जाणा दुर्‍हा­-विती ॥३॥
त्याचें पाप नाहीं खंडण सर्वथा । म्हणोनि अनंता भय वाटे ॥४॥
कोपला प्रहर ब्राह्मणा मारिला । लक्ष वेडावलीं भूषण-त्या ॥५॥
क्रोध अग्नि ज्वाळा झगटती जेथें । न उरती तेथें काडि-मात्रें ॥६॥
उगेंच ब्राह्मणा सांबें छळियेलें । सर्व शांत झाले आपो-आप ॥७॥
अपेक्षिती कोण्ही तेंचि तें होतें । न बोलावे येथें बोल कांहीं ॥८॥
अग्नीसी लहान थोर न ह्मणावा । पडे परिस्वाहा सर्व कांहीं ॥९॥
मार्कंडेय बुद्धि छळूनि ब्राह्मन । आयुश्य तें उणें होय माझें ॥१०॥
ब्राह्मणाचें वीर्य मातंगीचे पोटीं । त्याचि एका गोष्टी आशिर्वाद ॥११॥
आयुष्याचे कल्प सात चौदा होती । ऐ-कोनि विश्रांति कीर्तनानें ॥१२॥
धन्य गोत वित्त स्त्रिया आणि पुत्र । सर्व व्हावें हित ब्राह्मणातें ॥१३॥
कुळक्षयो व्हावे ऐसें वाटे जीवा । ब्राह्मणासीं दावा नको बापा ॥१४॥
नामा म्हणे ऐके धन्य ते ब्राह्मण । धरिले चरण माथां त्यांचे ॥१५॥

47

भक्त विठोबाचे भोळे । त्याचे पायीं ज्ञान लोळे ॥१॥
भक्तिवीण शब्दज्ञान । व्यर्थ अवघें तें जाण ॥२॥
नाहीं ज्याचे चित्तीं भक्ति । जळो तयाची व्युत्पत्ति ॥३॥
नामा ह्मणे ऐसें जाण । नाहीं भक्तासी बंधन ॥४॥

48

ऐसा संत विरळा भेटे भाग्ययोगें । आथिला वैराग्यें सप्रेमळ ॥१॥
सर्वभावें करूनि सर्वभूतीं करुणा । जेथें मीतूंपणा ठाव नाहीं ॥२॥
भजन तया नांव निर्विकार निकें । विश्र्वीं माझ्या देखे विठोबासी ॥३॥
अखंड ह्लदयीं तेचि आठवण । साजिरे सम-चरण विटेवरी ॥४॥
नादलुब्ध जैसा आसक्त हरिण । जाय विसरोन देहभाव ॥५॥
यापरी तल्लीन दृढ राखें मन । तयापरी श्रवण आव-डीचें ॥६॥
व्यवसायीं मन ठेवूनि कृपण । लाभाचें चिंतन सर्वकाळ ॥७॥
यापरी स्वहित अखंड विचारणें । करीं तें मनन सत्त्वशील ॥८॥
परपुरुषीं आसक्त जैसी व्यभिचारिणी । न लगे तिच्या मनीं घराचार ॥९॥
कीटकी भृंगीं जेंवि ऐसें अनुसंधान । निकें निज- ध्यासन दृढ होय ॥१०॥
सर्वभावें एक विठठलचि ध्यायीं । सर्वभूर्तीं पाही रूप त्याचें ॥११॥
सर्वांहूनि निराळा रजतमाहूनि वेगळा । भोगी प्रेमकळा तोचि भक्त ॥१२॥
सत्याचा सुभट नि:संगें एकट । वैराग्य उद्भट एकनिष्ट ॥१३॥
प्रारब्धाचे भागीं नेणें देहस्फुर्ति । अखंड ते धृति निरूपम ॥१४॥
निर्वासना मन निर्लोभ संपूर्ण । नेणें स्वरूपज्ञान संकल्पाचें ॥१५॥
अनुरागीं गोविंद गाईजे एकांतीं । या-परी विश्रांति आणिक नाहीं ॥१६॥
काया वाचा मन हा माझा अनु-भव । सांगितला सर्व आवडीचा ॥१७॥
नामा ह्मणे हेंहि बोलविले जेणें । उदार सर्वज्ञ पांडुरंग ॥१८॥

49

पिता शिकवी पुत्रासी । नको जाऊं बापा हरिकथेसि ।
तेथें पांचा तोंडांची विवशी । ते वैष्णवें आणिली आहे ॥१॥
तिचिया गळां रुंडमाळा । अंगीं स्मशानींचा उधळा ।
कंठीं सर्पाचें हळाहळ । गजचर्म पांघुरलें ॥२॥
नको जाऊं बापा तेथें । मागुता न येशीं रे येथें ।
जे जे पाहूं गेले तियेतें । ते आले नाहीं मागुते ॥३॥
चंद्र पाहों गेला तियेसी । ओढूनि बांधिला भाळेसी ।
तैसा पडसी अभरंवशीं । मग मुकशी संसारासी बापा ॥४॥
वारितां वारितां ध्रुव गेला । तो नेऊनि अढळपदीं घातला ।
बळीस देश-वटा दिधला । तो घातला पाताळीं ॥५॥
नारदा दिधली कांसवटी । हनुमान केला हिंपुटी ।
रुक्मांगदाची वैकुंठी । नगरी नेऊनि घातली ॥६॥
तिचें वैष्णव लहाणें । कळों नेदिती आपुलीं विंदानें ।
हरि-कथांरंगीं नाचणें । नामकल्लोळीं ॥७॥
तीस दहा हात अकरा डोळे । ती किती काळाची न कळे ।
भयानक श्रीमुख कमळें । हातीं घे-ऊनि हिंडतसे ॥८॥
भस्म डौर त्रिशूल हातीं । ते न वर्णवे वेदश्रुतीं ।
तीसी नाहीं कुळ याती । आपपर ते कैचें ॥९॥
ते वेदशास्त्रां अगो-चर । ती सवें असे एक ढोर ।
कोठें न मिळेचि बिढार । ह्मणोनि स्मशांनीं वसतसे ॥१०॥
ऐसी ती थोर लांव । तिसी गांव ना शीव ।
कोठेंचि न मिळे ठाव । म्हणोनि समुद्रीं ॥११॥
तेथें सर्पाचें अंथरूण करी । निद्रा उदका भीतरीं ।
तया वैष्णवा माझारीं । निरंतरी वर्ततसे ॥१२॥
सांगेन ते परियेसीं । आहे ती संत मह-तापाशीं ।
आणि हरिकथेसी । बैसली असे ॥१३॥
ह्मणवोनी विश्वासें तूं जासी । मुकसी आपल्या संसारासी ।
नामा विनवी श्रोतयांसी । हें बोलणें वेदांचें ॥१४॥

50

ऐसा आज्ञापी भक्तांसी आपण । त्यागा अभिमान तुह्मीं जाणा ॥१॥
जाणावें प्रत्यक्ष स्वरूप सगुण । सर्व नारायण तोचि दिसे ॥२॥
दिसे गोपाळांसी गोपिकांसहित । आनंदें डल्लत ह्मणे नामा ॥३॥

51

सांडूनि पंढरिची वारी । मोक्ष मागती ते भिकारी ॥१॥
ताट वोघरिलें निकें । सांडूनि कवण जाय भिके ॥२॥
जो नेणे नामगोडी । तोचि मुक्तितेम चरफडी ॥३॥
आह्मीम पंढरीचे लाटे । नवजों वैकुंठीचे वाटे ॥४॥
झणीं भ्याल गर्भवासा । नामा म्हणे विष्णुदासा ॥५॥

52

पढंरिची वारी करील जो कोणी । त्याच्या चक्रपाणी मागें पुढें ॥१॥
लोखंड असतां सोनें झालें कैसें । सभागम मिषें गुणें त्याच्या ॥२॥
तैसेम एक वेळ करीं मायबापा । चुकवीं या खेपा चौर्‍यांशींच्या ॥३॥
नामा ह्मणे असो प्रारब्ध सरे । होई कृपण नीकुरे चरणाचे ॥४॥

53

पंढरीस जावें जीवन्मुक्त व्हावेम । विठ्ठला भेटावें जिव-लगा ॥१॥
कायावाचामन चरणीं ठेवावें । प्रेमसुख घ्यावें सर्वकाळ ॥२॥
सुखाचें साजिरें श्रीमुख पहावें । जीवें उतरावें निंबलोण ॥३॥
बाहेरी भीतरीं कैवल्य आघवें । वाचे न बोलावें ब्रह्मानंदु ॥४॥
चिरंजीव नामा कंठीं धरी प्राण । करी तुझें ध्यान रात्रंदिवस ॥५॥

54

विचारूनि पाहा पंढरिचें पाडें । सुख होय थोडें क्षी-रसिंधू ॥१॥
सांडूनि वैकुंठ आले जगजेठी । वस्ती वाळवंटीं केली जाण ॥२॥
भक्त सहाकारी ब्रीदें बडिवार । सेवा सुखसार पांडुरंग ॥३॥
जीवींचे सोयरे न मिळे वैकुंठीं । हरिदासा भेटी आडलिया ॥४॥
प्रीतीचे वोरस उभा मागें पुढें । जीवासी आवडे भक्त राणा ॥५॥
लक्ष्मीचा विलासी न वाटे विश्रांती । आवडे श्रीपति भक्तभावा ॥६॥
सगें सर्वकाळ धांवे पाटो वाटी । घाली कृपादृष्टी तयावरी ॥७॥
अमृत सुरस नव्हेति पैं गोडी । ह्मणोनि आवडी कालयाची ॥८॥
ह-रुषें निर्भर सुरवरा खेळे । वाळवंटी लोळे संतसंगेम ॥९॥
अठ्ठावीस युगें उभा विटेवरी । भक्तप्रीय हरि स्वामि माझा ॥१०॥
नामा ह्मणे त्याचे सुखरूप पाय । क्षणेक न होय जीवाहुनी ॥११॥

55

पुंडलिकें रचिली पेंठ । संत ग्राहिक चोखट ॥१॥
प्रेम साखरा वांटिती । नेघे त्यांचे तोंडीं माती ॥२॥
समतेचे फ-णस गरे । आंबे पिकले पडिभरें ॥३॥
नामद्राक्षाचे घड । अपार रस आले गोड ॥४॥
नामा म्हणे भावें घ्यावें । अभक्तांचें मढें जावें ॥५॥

56

कर्मजड मूढ पतीत पामर । भवसिंधु पार नटके जया ॥१॥
यालागीं पंढरी केली मुक्ति पेंठ । भक्तें भूवैकुंठ वसविलें ॥२॥
हेंचि पुंडलिकें मागितलें निक्रें । जें सर्वथा परलोकें चाड नाहीं ॥३॥
भक्ति मुक्ति सिद्धि जें जया आवडे । तें तया पवादे विठ्ठलनामें ॥४॥
न लगती सायास करणेम कायाक्लेश । ना-साचा विश्वास दृढ धरा ॥५॥
नामा ह्मणे अवघे चला पंढरीये । भेटों बापमाय पांडुरंगा ॥६॥

57

अठ्ठावीस युगें उभा ठेला द्बारीं । पुंडलीकावरी ठेवुनि लक्ष ॥१॥
कृपेचा सागर भक्तजनवत्सल । आमुचा विठ्ठल माय- बाप ॥२॥
भक्तीसि भाळला अरूप रूपा आला । वेळाईंत झाला भक्तांलागीं ॥३॥
भक्तीचिया रूपें न घडे तें केलें । वैकुंठा आ-णिलें भूमंडळीं ॥४॥
भक्ति मुक्ति सिद्धि त्यापायीं लागती । उ-द्धट गर्जती विठ्ठलनामें ॥५॥
नामा ह्मणे केशव उदाराचा राव । सेवा चरणीं ठाव देईं आह्मां ॥६॥

58

विठ्ठलाचे पाय मनीं धरोनि राहे । मग संसार तें काय करील तुझें ॥१॥
संसाराचें भय नाहीं हरिच्या दासा । विठो आह्मां सरिसा निरंतर ॥२॥
निरंतर वसे हरि भक्तांपाशीं । विसं-वेना त्यासी कदाकाळीं ॥३॥
नामा म्हणे ऐसा विठ्ठल सांडोनि । व्यर्थ काय जनीं शिणताती ॥४॥

59

शब्दाचें सुख श्रवणाचेनि द्वारें । माझिया दातारें ऐसें केलें ॥१॥
स्पर्शाचें सुख त्वचेचेनि द्वारे । माझिया दातारें ऐसें केलें ॥२॥
रूपाचें सुख नेत्राचेनि द्वारें । माझिया दातारें ऐसें केलें ॥३॥
रसाचें तें सुख रसनेचेनि द्वारें । माझिया दातारें ऐसें केलें ॥४॥
गधाचें सुख नाकाचेनि द्वारें । माझिया दातारें ऐसें केलें ॥५॥
नामा म्हणे ऐसे जयाचे उपकार । तयासी गव्हार विसरले ॥६॥

60

आप तेज वायु पृथ्वी आणि गगन । त्यांचें बा केलें श-रीरनिधान ॥१॥
त्यामाजीं घातलें मन पवन । पिंडब्रह्मांड केली रचना ॥२॥
काय सांगों तुझी करणी नारायणा । वेदपारायणा केशिराजा ॥३॥
पृथ्वीवरी तीर्थें आहेत अपार । परि पंढरीची सर एका नाहीं ॥४॥
जन्मोजन्मींच्या पातका दरारा । चुके येरझारा एके खेपे ॥५॥
ब्रह्म-ज्ञानेंवीन मोक्ष आहे भूतीं । वाचेसि ह्मणती विठ्ठलनाम ॥६॥
बेचाळी-सांसहित जातीत वैकुंठा । नामा ह्मणे भेटा विठ्ठलदेवा ॥७॥

  • मुख्य पृष्ठ : संपूर्ण काव्य रचनाएँ : संत नामदेव जी
  • मुख्य पृष्ठ : हिन्दी कविता वेबसाइट (hindi-kavita.com)