संत नामदेवांचे अभंग उपासकांस उपदेश

Upaskans Updesh : Sant Namdev Ji

उपासकांस उपदेश
1

जाखाई जोखाई उदंड दैवतें । वाउगेंचि व्यर्थ श्रमतोसी ॥१॥
अंतकाळीं तुज सोडविना कोणी । एक्या चक्र-पाणी वांचोनियां ॥२॥
मागें थोर थोर कोणें केलें तप । उद्धरीलें अमूप नारायणें ॥३॥
नामा म्हणे ऐसे बहु झाले भांड । न उच्चारी लंड नाम वाचे ॥४॥

2

नानापरिचीं दैवतें । बहुत असती असंख्यातें ॥१॥
सेंदुर शेरणी जीं इच्छितीं । तीं काय आर्त पुरविती ॥।२॥
अंध नको होऊं आलीया । भज भज पंढरिराया ॥३॥
सोडूं नको विष्णु त्रिपार-णिया । तोडी कुलूप पाठी गळ टोचोनियां ॥४॥
बाळा अबळा मुकी मौळी । क्षुद्र देवता जीवदान बळी । तेणें न पावती सुख कल्लोंळी । एक विठ्ठलावांचूनियां ॥५॥
नाना धातूची प्रतीमा केली । षोडशोपचारें पूजा केली । दुकळी विकूनि खादळी । तें काय आर्त पुरविती ॥६॥
आतां दृढ धरोनियां भाव । वोळगा वोळगा पंढ-रिराव । आपुले चरणीं देईल ठाव । विष्णुदास नामा ह्मणे ॥७॥

3

खाटिकाप्रमाणें करिसी व्यापार । मनीं निरंतर धरो नियां ॥१॥
दुष्ट दुचाचारी दुर्बळ घातकी । परम नाशकी पापिष्ट तो ॥२॥
अपमानीं आशा धन मेळविसी । अंतीं नरकासि जासी जाण सत्य ॥३॥
नामा म्हणे जाण करूं मोटयाळें । जाऊनियां लोळे विष्टेमाजी ॥४॥

4

आपुली करणी न विचारी मनीं । वांयां काय ठेवूनि बोल जिवा ॥१॥
खाटकी जो चेपी पशूची नरडी । अवचिता करं-गळी सांपडली ॥२॥
मेलों मेलों ह्मणूनि गडबडां लोळे । परि कापी गळे आठवीना ॥३॥
आपुलें ह्मणवूनि विव्हळतसे । खदखदां हांसे दुस-र्‍यासी ॥४॥
वाटपाडयानें घर खाणोनि घेतलें । जितुकें मेळविलें तितुकें नेलें ॥५॥
आपुलें नेलें म्हणऊनि खलखळां रडे । परि घेतां दरवडे आठवीना ॥६॥
सोनाराचे घरीं पडिलेसें खाण । चोरिलें सुवर्ण तेंहि नेलें ॥७॥
आपुलें नेलें म्हणऊनि मोकलितो धाया । ठक-विल्या आयाबाया तें आठवीन ॥८॥
तराळा़चे घरीं आला असे जेव्हां । ह्मणतसे देवा काय करूम ॥९॥
दुसर्‍यासी मागतां परम सुख वाटे । आपण देतां फुटे काळीज तें ॥१०॥
जन्मवरी पोशिलें लेंकुराचे परि । हातीं घेऊनि सुरी उभा राहे ॥११॥
गर्दन सुळीं देतां म्हणे काय केलें । पुढिल्यासि मारिलें आठ-वीना ॥१२॥
नामा ह्मणे विष्णुदास ऐसे जे निर्लज्ज । त्यांसी पंढरि-राज केंवि भेटे ॥१३॥

5

अर्चन विष्णूचें नाहीं पूजन । तये गांवींचे अनामिक जन । भूतप्रेताचें करिती भजन । तयासि दंडन करी यम ॥१॥
हरीचे वांचोनि सुकृत करी । तया नांव पुण्य ठेविजे जरी । तुटोनि पडो त्यांची वैखरी । अंतीं महा अघोरीं वास तया ॥२॥
समारंभ करिती आणिक देवाचा । ह्मणती येणें विष्णु तृप्त होय साचा । धिग्‍ धिग्‍ आचार जळो त्यांचा । वांयांवीण वाचा विटाळली ॥३॥
पहा हो नवही द्बारें एकचि देहीं । रसस्वाद कान देतील कांहीं । जयाचा मान तयाच्या ठायीं । येतसे पाहीं सेवितां ॥४॥
जो देवदेवतां शिरोमणि । असुर रुळती जयाच्या चरणीं । तो सांडिती चकपाणी । भजना हातीं होईल तुझिया ॥५॥
विष्णुदास नामा विनवी जगा । अझूनि तरी हरीसि शरण रिघा । जे जे अपराध केले असतील मागा । ते ते नेईल भंगा स्वामि माझा ॥६॥

6

पोटीं अहंतेसी ठाव । जिव्हे सकळ शास्त्रांचा सराव ॥१॥
भजन चालिलें उफराटें । कोण जाणे खरें खोटें ॥२॥
सजि-वासी हाणी लाथा । निर्जिवपायीं ठेवी माथा ॥३॥
सजीव तुळसी तोडा । पूजा निर्जिव दगडा ॥४॥
वेला करी तोडातोडी । शिवा लाखोली रोकडी ॥५॥
तोंड धरून मेंढा तारा । म्हणति सोमयाग करा ॥६॥
सिंदूर माखूनियां धोंडा । त्यासि भजती पोरेंरांडा ॥७॥
अग्निहोत्राचा सुकळ । कुश पिंपळाचा काळ ॥८।
एत्तिकेची पूजा नाना । जित्या नागा घेती डांगा ॥९॥
नामा ह्मणे अवघें खोटें । एक हरिनाम गोमर्टे ॥१०॥

7

व्यर्थ या व्युत्पत्ति लवितोसी श्रुति । विषयांची तृप्ति काय चाड ॥१॥
मायेचा हा फांसा मोहजाळ सोसा । वांयां कासा-विसा होसी झणीं ॥२॥
टाकीं टाकीं असत्य विठ्ठल हेंचि सत्य । होईल सर्व कृत्य एका नामें ॥३॥
नामा म्हणे दैवत एक तो अच्युत । सांगितलें हित खेचर विसें ॥४॥

8

या विठोबापरतें आन दैवत म्हणती । ते शब्द नाय-कवती कानीं माझ्या ॥१॥
पाखांडी म्हणती उगेंचि असावें । हा ब्रह्मकटाह करूं शके न अनारिसा ॥२॥
तोहि जरी म्हणेल अहं-ब्रह्मास । तरी न पहावी वास येहीं नयनीं ॥३॥
कोटि कोटी ब्रह्मांडें एक एक्या रोमीं । व्यापोनियां व्योमीं वर्ततसे ॥४॥
ऐसा माझा विठो सर्वां घटीं सम । न संडावें वर्म नामा म्हणे ॥५॥

9

केशवापरता देव आणिक आहेती । ऐसें श्रुति स्मृति बोलतील ॥१॥
तरी ते शब्द झणीं कानीं हो पडती । पाखांडी ह्मणती सहावें तें ॥२॥
इमद्रियांसि तुह्मी करा रे जतन । भजावा निधान श्रीविठ्ठल ॥३॥
छेदावया शिर हस्त सहस्रांचें । जरी बहूतांचे उगा-रिले ॥४॥
परि तूतें नाम आन न देवाचें । केशवापरतें कैंचें असे ब्रह्म ॥५॥
अंगें चतुरानना झालिया हो भेटी । तोहि जरी गोष्टी ऐसी करी ॥६॥
तरी तो चळला पोटीं ऐसें जाण । एकीं दुजेपण दावी तरी ॥७॥
ब्रह्मकटाह एक उल्लंघों शके ऐसा । वर्तोनि दाही दिशा वर्ते जरी ॥८॥
केशव नव्हे तो हो कां अनारिसा । म्हणोनियां वासा पाहों नक ॥९॥
व्यसन भक्ति विरक्ति प्रौढी पुरुषार्थ पांचवा । जीवा-चिया सेवा ना कां ॥१०॥
सर्वाभूतीं आहे केशव परमात्मा । न विसंबावें वर्मां नामा ह्मणे ॥११॥

  • मुख्य पृष्ठ : संपूर्ण काव्य रचनाएँ : संत नामदेव जी
  • मुख्य पृष्ठ : हिन्दी कविता वेबसाइट (hindi-kavita.com)