संत नामदेवांचे अभंग खलदुर्जनांस उपदेश

Khaldurjanans Updesh : Sant Namdev Ji

खलदुर्जनांस उपदेश
1

दुर्जनाची बुद्धि वोखटी दारुण । आपण मरून दुजा मारी ॥१॥
माशी जातां पोटीं मेली तेचि क्षणीं । प्राण्या वोकवूनि कष्टी करी ॥२॥
दीपकाची ज्योति पतंग नासला । अंधार पडिला जनामध्यें ॥३॥
तैसा नैसर्गिक स्वभाव दुष्टांचा । शेखीं ज्याचा त्यासी फळां येतो ॥४॥
झाली सज्जनाची संगति कदापि । जाईना तथापि त्याची क्रिया ॥५॥
सहज मळलें धुतां शुद्ध होय । बिब-याचा काय डाग जातो ॥६॥
वज्रहि फुटेल नभहि तुटेल । भला तो होईल ऐसा जाणा ॥७॥
नामा म्हणे कुंभपाकींचा तो धनी । त-यासी भल्यांनीं बोलूं नये ॥८॥

2

दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा । संग न करावा पापि-याचा ॥१॥
सर्पाचें पिलें सानें ह्मणऊनि पोशिलें । त्यासी पान दिधलें अमृताचें ॥२॥
नव्हे तें निर्विष न संडी स्वभावगुण । घेऊं पाहे प्राण पोसित्याचे ॥३॥
विष्णुदास नामा सांगतसे युक्ति । विवेक हा चित्तीं दृढ धरा ॥४॥

3

समर्थासी करीं क्रोध हे अहंता । अखंड ममता मानी सदा ॥१॥
आपुली आपण व्यर्थ सांगे स्तुति । वडिलांची कीर्ति भोग सांगे ॥२॥
वमन झालीया सांचितसे अन्न । काय तो दुर्जन भाग्यहीन ॥३॥
नामा ह्मणे जाण असतां शरीरीं । जातो यमपुरीं भोगावया ॥४॥

4

कोळशासी दूध मर्दोनियां धूतां । न पावे शुद्धता कांहीं केल्या ॥१॥
दुर्जनासी तैसा बोध परमार्थ । नवजायचि स्वार्थ कांहीं केल्या ॥२॥
सूकराचे परी नेणती मिष्टान्न । विष्टा ते भक्षण करीतती ॥३॥
मोहियले प्राणी पाहतां पाहतां । काय सांगूं आतां नवलावो ॥४॥
नामा ह्मणे तया न होयचि मोक्ष । येवोनि पद्माक्ष केविं भेटे ॥५॥

5

वेडिया उपचार गाढवा गुर्‍हाळ । ह्मैसिया बिर्‍हाड पुष्पवनीं ॥१॥
पद्मासनीं केंवि कुंजर हा बैसे । कोडिया न दिसे चंदन बरवा ॥२॥
तैसा नव्हे देव मूर्ख जनांच्या भक्ति । भल्याचा विरक्ति ज्ञानवांटा ॥३॥
शेळीस ऊंस कळकटीया सुदिवस । सूकराप्रित रस आंबियाचा ॥४॥
दर्दुरा क्षीरपान त्रिदोषिया मौन । मद्यपिया मन स्थिर नव्हे ॥५॥
नामा ह्मणे हरि सबाह्य भरला । भरोनि उरला दाही दिशा ॥६॥

6

थिल्लर तें नेणे सागराचा अंत । मुंगीस अग्नींत रीघ नाहीं ॥१॥
श्वान काय जाणे मेरूचें प्रमाण । कोसळल्या गगन न कळे त्यास ॥२॥
अंध काय जाणे कैसा उगवे दीन । पाषाणा पर्जन्य नकळे जेंवी ॥३॥
देहवंत जीव काय जाणे देव । नामा ह्मणे भाव काय तेथें ॥४॥

7

जाळें टाकिलें सागरीं । उदक नयेची चुळभरी ॥१॥
तैसें पापियाचें मन । ज्या नावडे हरिकीर्तन ॥२॥
सावजीं केला कोल्हा राव । तो न संडी आपुला भाव ॥३॥
गाढव गंगेसि न्हा- णीले । पुढती लोळूं ते लागले ॥४॥
श्र्वान बैसविलें पालखीं । वरती मान करूनि भुंकी ॥५॥
नगर नावडे विखारा । दर्पण नावडे नकठ्या नरा ॥६॥
पति नावडे शिंदळी । जाय परपुरुषाजवळी ॥७॥
नामा ह्मणे बा श्रीहरि । कोडय नावडे कस्तुरी ॥८॥

8

जयाचे उदरीं जन्मला नर । पिडी तया थोर सर्वकाळ ॥१॥
मानिली अंतरीं सखी जीवनलग । आत्महत्या मग घात करी ॥२॥
मानीना तो भक्ति भ्रष्ट आचरण । दोषी नारायण सदोदित ॥३॥
नामा म्हने ऐसे पातकी चांडाळ । बुडविलें कुळ बेचाळिस ॥४॥

9

अभक्ताचे स्थळीं भ्रांताची संगती । परदारा चित्तीं परनिंदा ॥१॥
नेणे भूतदया शांतीचे लक्षण । कार्या कारन बोलतरे ॥२॥
हरिचिया दासा करिती मत्सर । करी निरतर द्वेषबुद्धि ॥३॥
नामा ह्मणे व्यर्थ पेटला पर्वत । नेणे अपघात स्वयें पावें ॥४॥

10

विशयासंगें सवीं जागे । हरिकीर्तनीं झोंप लागे ॥१॥
काय करूं या मनासी । नाठवेचि ह्लषिकेशी ॥२॥
दिवसा व्यापार चावटी । रात्रीं कुटुंबचिंता मोठी ॥३॥
नामा म्हणे कां आलासी । भूमिभार जन्मलासी ॥४॥

11

मूर्ख बैसले कीर्तनीं । न कळे अर्थाची करणी ॥१॥
घुबड पाहे भलतीकडे । नाइके नामा चे पवाडे ॥२॥
पाहूं इच्छी पर-नारी । चित्त पादरक्षावरी ॥३॥
नामा म्हणे सांगूं किती । मूढ सां-गितलें नाइकती ॥४॥

12

कथे बैसोनि उठोनी जाती । खर होऊनि फिरती ॥१॥
नाम नावडे नावडे । संग वैष्णवांचा न घडे ॥२॥
नामा ह्मणे सांगों किती । पूर्ण जांसहित नरका जाती ॥३॥

13

करंटें कपाळ नाम नये वाचे । सदैव दैवाचें प्रेम नामीं ॥१॥
जोडियेली जोडी हुंडारि दुरी । नावडें पंढरी तया जना ॥२॥
आपण नवजे दुजिया जावों नेदी । ऐसा तो कुबुद्धि नागवितो ॥३॥
नामा ह्मणे नाम गर्जे वारकरी । वैकुंठ पंढरी देशोदेशीं ॥४॥

  • मुख्य पृष्ठ : संपूर्ण काव्य रचनाएँ : संत नामदेव जी
  • मुख्य पृष्ठ : हिन्दी कविता वेबसाइट (hindi-kavita.com)