संत नामदेवांचे अभंग संसारिकांस उपदेश

Sansarikans Updesh : Sant Namdev Ji

संसारिकांस उपदेश
1

जन्मा येऊनियां काय पुण्य केलें । बाळपण गेलें वांयांविण ॥१॥
संतसंगें सुख हुंडारलें जाणा । नामसंकीर्तना ओळखत ॥२॥
तरुणपणोंहि नाठवेचि देवा । वृद्धपणीं सेवा अंतरली ॥३॥
यापरी जन्मुनि गेलसिरे वांयां । पंढरीच्या राया नोळखतां ॥४॥
आलों मी संसारीं गुंतलों व्यापारीं । आझूनि कां श्रीहरि नोळखली ॥५॥
सहस्र अपराध जरी म्यांरे केले । तारिलें विठ्ठलें म्हणे नामा ॥६॥

2

बाळपणीं वर्षे बारा । तीं तुझीं गेलीरें अवधारा । तैं तूं घांवसी सैरा । खेळाचेनि विनोदें ॥१॥
ह्मणवोनि आहेस नागर तरुणा । तवं वोळगे रामराणा । आलिया म्हातारपणां । मग तुज कैंचि आठवण ॥२॥
तुज भरलीं अठरा । मग तूं होसी निमासुरा । पहिले पंच-विसीच्या भरा । झणें गव्हारा भुललासी ॥३॥
आणिक भरलिया सात पांचा । मग होसी महिमेचा । गर्वें खिळेल तुझी वाचा । देवा ब्राह्मणांतें न भजसी ॥४॥
त्वचा मांस शिरा जाळी। बांधोनि हाडांची मोळी । लेखि-तोसि सदाकाळी । देहचि रत्न आहे माझें ॥५॥
बहु भ्रम या शिराचा रे । ह्मणे मी मी तारुण्याच्या भरें । ऐसा संशय मनाचा रे । तूं संडीं रे अज्ञाणा ॥६॥
माथवीय पडे मासोळी । ते म्हणे मी आहे प्रबळ जळीं । तैसी विषयाच्या पाल्हाळीं । भूललसिरे ग-व्हारा ॥७॥
तुज भरलिया सांठीं । मग तुझ्या हातीं येईल काठीं । मग ती अडोरे लागती । म्हणती बागुल आलारे ॥८॥
म्हणती थोररे म्हातारा । कानीं झालसि बहिरा । कैसें न ऐकसी परिकरा । नाम हरिहरांचें ॥९॥
दांतांची पाथीं उठी । मग चाववेना भाकर रोटी । नाक लागलें हनुवटी । नाम होटीं न उच्चारवे ॥१०॥
बैसोनि उंबरवटिया तळवटी । आया बाया सांगती गोष्टी । म्हणती म्हातारा बैल दृष्टी । कैसा अक्षयीं झाला गे ॥११॥
खोकलिया येतसे खंकारा । म्हणती रांडेचा म्हातारा । अझूनि न जाय मरण द्वारां । किती दिवस चालेल ॥१२॥
ऐसा जाणोनि अवसर । वोळगा वेगें सारंगधर । विष्णुदास नामया दातार । वर विठ्ठल पंढरीये ॥१३॥

3

बाळपणीं हिची वर्षें गेलीं बारा । खेळतां दे पोरा नाना-मतें ॥१॥
विटु दांडु चेंडु लगोर्‍या बाघोडे । चपे पेडखदे एकीबेकी ॥२॥
सेलदोरे खेळी आणि सलवडी । उचलिती धोंडी अंगबळें ॥३॥
कोंबडा कोंबडी आणि पाणबुडी । आणि सेलडी लिंबुठिंबु ॥४॥
नामा म्हणे ऐसें गेलें बाळपण । मग आलें जाण तारुण्य तें ॥५॥

4

संसारसागर भरला दुस्तर । विवेकी पोहणार विरला अंत ॥१॥
कामाचिया लाटा अंगीं आदळती । नेणों गेले किती पाहोनियां ॥२॥
भ्रम हा भोंवरा फिरबी गरगरा । एक प-डिले धरा चौर्‍यांशींच्या ॥३॥
नावाडया विठ्ठल भवसिंधु तारूं । भक्तां पैलपारू उतरीतो ॥४॥
नामा म्हणे नाम स्मरा श्रीरामाचें । भय कळिकाळाचें नाहीं तुह्मां ॥५॥

5

संसार करितां देव जैं सांपडे । तरि कां झाले वेडे सन-कादिक ॥१॥
संसारीं असतां जरी भेटता । शुकदेव कासया जाता तयालागीं ॥२॥
घराश्रमीं जरी जोडे परब्रम्ह । तरि कां घराश्रम त्याग केला ॥३॥
ज्ञातीच्या आचारें सांपडे जरी सार । तरि कां निरहंकार झाले साधु ॥४॥
नामा म्हणे आतां सकळ सांडोन । आलोंसे शरण विठोबासी ॥५॥

6

परब्रह्मींची गोडी नेणतीं तीं बापुडीं । संसार सांकडीं विषयभरित ॥१॥
तूंतें चुकलीरे जगजीवन रक्षा । अनुभवाविण लक्षा नयेचिरे कोणा ॥२॥
जवळीं अलतांचि क्षीर नव्हेसि वरपडा । रुधिर सेवितां गोचिडा जन्म गेला ॥३॥
दुर्दुरा कमळिणी एके ठायीं बिढार । वास तो मधुकर घेवोनि गेला ॥४॥
मधुमक्षिया मोहोळ रचितां रात्रंदिवरा । भाग्यवंत रस घेऊनि गेला ॥५॥
शेळीस घात-ली उसांची वैरणी । घेऊं नेणे धणी त्या रसाची ॥६॥
नामा म्हणे ऐसीं चुकलीं बापुडीं । अमृत सेवितां पुढीं चवी नेणे ॥७॥

7

मिथ्या मायाजाळ मृगजळ बाधा । लागलासे धंदा संसारीया ॥१॥
आलेंरे आलेंरे हाकित टाकित । मूढा गिवसीत काळचक्रीं ॥२॥
बंधनापासूनि बांधलासे पायीं । बुडतों मी डोहीं निर्जळा ये ॥३॥
कोण भरंवसा धरिलासे जिवीं । बळीया सोडवी कदा काळीं ॥४॥
पुत्रपत्नी बंधु म्हणसील झणी । धांवोनि निर्वाणीं पाव आतां ॥५॥
नामा ह्मणे वेगीं सावधान व्हावें । शरणही जावें पांडुरंगा ॥६॥

8

आलेनो संसारा सोडवणें करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥
प्रपंच न सरे कदा कल्पकोडी । वासनेचि बेडी पडे पायीं ॥२॥
व्यर्थ मायादेवी गर्भवास गोची । नश्वर भोगाची नाना-योनी ॥३॥
नामा म्हणे पहा विचारूनि मनीं । स्मरावा निर्वाणीं पांडुरंग ॥४॥

9

आळेनो संसारा उठा वेगें चला । जिवलग विठ्ठला मे-ठीलागीं ॥१॥
दुर्लभ मनुष्य जन्म व लभेरे मागुता । लाहो घ्या स-र्वथा पंढरीचा ॥२॥
भावें लोटांगण पाला महाद्वारीं । होईल बो-हरी त्रिविध तापा ॥३॥
श्रीमुखाची वास पहा घणीवरी । आठवी अंतरीं घडिये घडिये ॥४॥
शुद्ध सुमनें कंठीं घाला तुळशीमाळा । तनमन ओवाळा चरणांवरूनि ॥५॥
नामा ह्मणे विठो अनाथा को-वसा । पुढती गर्भवासा येऊं नेदी ॥६॥

10

अवघे निरंतर करा हा विचार । भवसिंधुपार तरीजे ऐसा ॥१॥
अवघे जन्म वांयां गेले विषयसंगें । भुललेति वाउगे माया मोहा ॥२॥
अवघा वेळ करितां संसाराचा धंदा । वाचे वसो सदा हरिचें नाम ॥३॥
अवघ्या भावीं एका विठ्ठलातें भजा । आर्तें करा पूजा हरिदासांची ॥४॥
अवघें सुख तुह्मां होईल आपैतें । न याला मागुते गर्भवासा ॥५॥
नामा ह्मणे अवघे अनुभवूनि पाहा । सर्वकाळीं रहा संतसंगे ॥६॥

11

अवघे सावधान होऊनि विचारा । सोडवण करा संसाराची ॥१॥
अवघा काळ वाचे ह्मणा नारायण वांयां एक क्षण जाऊं नेदी ॥२॥
अवघें हें आयुष्य सरोनि जाईल । मग कोण होईल साह्य तुह्मां ॥३॥
अवघा प्रपंच जाणोनि लटिका । शरण रिघा एका पंढरिराया ॥४॥
अवघे मायामोह गुंतलेति पहा । अवघे स-हज आहां जीवन्मुक्त ॥५॥
नामा म्हणे अवघे सुखाचेचि व्हाल । जरी मन ठेवाल विठ्ठलापायीं ॥६॥

12

जळीं बुडबुडे देखतां देखतां । क्षण न लागतां दि-सेनाती ॥१॥
तैसा हा संसार पाहतां पाहतां । अंत:काळीं हासां काय नाहीं ॥२॥
गारुडयाचा खेळ दिसे क्षणभर । तैसा हा संप्तार दिसे खरा ॥३॥
नामा म्हणे तेथें कांहीं नसे बरें । क्षणाचें हें सर्व खरें आहे ॥४॥

13

संसारार्चे दु:खसुख ह्मणों नये । पुढें दु:ख पाहे अ-निवार ॥१॥
तया दु:खा नाही अतपार जाणा । काळाची यातना बहुतांपरी ॥२॥
संसाराची चिता वाहतं जन्म गेला । सोस हा वाढला बहुतांपरी ॥३॥
हित ही बुडालें परत्र दुणावलें । नरदेह बुडविलें भजनाविण ॥४॥
भजनाचा प्रताप दु:ख दुरी जाय । जैसें आश्र होय देशधडी ॥५॥
वायूच्या झुंझाटें वृक्ष उन्मळती । परी माना गति तैसें दु:ख ॥६॥
नामा म्हणे नाम दु:खाचा परिहार । सुखाचा अनिवार पार नाहीं ॥७॥

14

प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोडी । वासनेची बेडी पडाली पाथीं ॥१॥
सोडवण करा आलेनो संसारा । शरण जा उदारा विछोबासी ॥२॥
लटकी माया देवी गर्भवासीं गोंवी । नरक भोगवी नानायोनी ॥३॥
नामा ह्मणे तुह्मी विचारावें मनीं । सोयरा निर्वाणीं पांडुरंग ॥४॥

15

प्रपंच स्वार्थासि साधावया चांग । वैराग्याचें अंग दाविसी जना ॥१॥
अनुताप नित्य नाहीं कदाकाळीं । मग संचि-ताची होळी कैसी होय ॥२॥
पवित्र ते वाचा कांरे गमाविसी । रामनाम न ह्मणसी अरे मूढा ॥३॥
नामा ह्मणे जीव कासया ठेवावा । न भजतां केशवा मायबापा ॥४॥

16

स्वयें घरदार प्रपंच मांडिला । जोडूनियां दिला बाळा हातीं ॥१॥
तैसें सर्वांभूतीं असावें संसारी । प्राचीनाची दोरी साक्ष आहे ॥२॥
नामा ह्मणे आह्मां नाहीं प्रापंचिक । पंढरिनायक साह्य झाला ॥३॥

17

फुटल्या घडयाचें नाहीं नागवणें । संसार भोगणें तेनें न्यायें ॥१॥
स्वप्नींची मात जागृतीस सांगे । तैसा भवरोग प्रारब्धाचा ॥२॥
नामा ह्मणे आतां जाणा तो संसार । वाउगा पसार जाय जाणा ॥३॥

18

जाय जणा देह जाईल नेणसी । लैकिक मिरविसी लाजसी ना ॥१॥
माझें माझें माझें मानिसी निभ्रांत । करिसी अपघात रात्रंदिवस ॥२॥
सांग तूं कोणाचा आलसि कोठोनि । दृष बुद्धि मनीं विचारी पां ॥३॥
धन संपत्ति करोनि मदें मातलासी । पुढत पुढती पडसी गर्भवासीं ॥४॥
पुत्र कलत्र दारा यांचा झालासी ह्मणियारा । यांच्या पातकाचा भारा वाहशील ॥५॥
अंतीं यमापाशीं बांधो-नियां नेति । कवतुक पाहती सकळ जन ॥६॥
नानापरी तुज क-रिती यातना । सांग तेथें कोणा बोभाशील ॥७॥
धन पुत्र दारा तुज नये कामा । एका मेघश्यामा वांचोनियां ॥८॥
विषयाचेनि संगें भुलशील झणें । भोगीसी पतन रात्रंदिवस ॥९॥
नामा ह्मणे ऐक ध्यायीं कमळापति । निजाचा सांगाति केशिराज ॥१०॥

19

शरीर काळाचें भातुकें । तुह्मीं नेणां कां इतुकें ॥१॥
माझा जन्म गेला वांयां । तुजविण पंढरिराया ॥२॥
अझूनि तूं कां रे निचिंत । काळ जवळीं हटकीत ॥३॥
नामा ह्मणे अवघे चोर । शेखीं हरिनाम सोयरे ॥४॥

20

क्षणक्षणां देहीं आयुष्य हें काटे । वासना हे वाटे नित्य नवी ॥१॥
माझें मी ह्मणतो गेले नेणों किती । र्मक चक्रवर्ति असं-ख्यात ॥२॥
देह जाय तोंवरी अभिमान । न करीं अज्ञान आत्म-हित ॥३॥
मोहाचीं सोयरीं मिळोनि चोरटीं । खाऊनि करंटीं घेती घर ॥४॥
जोंवरी संपत्ति तोंवरी हा निके । धनासवें भुंके तयांमागें ॥५॥
नामा ह्मणे झालों केशवाचा दास । दाखवी वोरस तुझ्या नामीं ॥६॥

21

औट हात घर जायाचें कोपट । दोन दिवस फुकट भोगा कांरे ॥१॥
कवणाचें घर कवणाचें दारा । भावें नरहरि ओळंगारे ॥२॥
आडें मोडलें घर झांजर झालें । वारा आला तेणें मोडोनि गेलें ॥३॥
खचला पाया पडली भिंती । नामा ह्मणे घर नलगे चित्तीं ॥४॥

22

देह आहे तंव करारे धांवणी । शरण चक्रपाणी रिघा वेगीं ॥१॥
येर ते लटिके इष्टमित्र सखें । हे तंव पारीखे सर्व चोर ॥२॥
लावूनि मोहातें दास्यत्व करविती । अंतकाळीं होती पाठि-मोरे ॥३॥
मायेचे भूलीनें भुललीं सकळें । हें तुज न कळे कटकट ॥४॥
यापरी आयुष्य वेंचेलरे जना । पुढें यमयातना न चुकती ॥५॥
धोतरा देऊनि चोर सर्व हरीती । नामा ह्मणे गति तेचि झाली ॥६॥

23

यम सांगे दूतां । तुह्मीं जावें मृत्युलोका । आपुलाला लोक जितुका । तितुका आणावा ॥१॥
तुह्मां सांगतों कुळरंग । निंदा द्वेष करिती राग । खरी खोटी चाहडी सांगे । ते कुळ आ-पुलें ॥२॥
ज्याचें विषयावर ध्यान । परद्रव्य परस्त्री गमन । धर्मासी विन्मुखपणा । तें कुळ आपुलें ॥३॥
भावेंविण भक्ति करिती । भक्तिविणें भाव दाविती । त्यांची तुह्मीं फजिती । बहुतां प्रकारें करावी ॥४॥
मंत्रसंचारी जे लोक । देव सांडून देवताउपासक । झोटिंग वेताल खेताल देख । ते सखे बाप तुमचे ॥५॥
लटिके वासनेच्या नवसा । करिती करविती पशुहिंसा । त्यानें बहुत दिवस भरंवसा । दिला आहे ॥६॥
धातकी पातकी गुरुद्रोही । हित सांगतां गुरूसी हेडवी । विष्णुदासावेगळें करून पाहीं । सांगितले तितुके आणावे ॥७॥
नामा ह्मणे एक्या पातकीयाम दंडिताती । नाना विपत्ति काय सांगूं किती । विष्णुसासाचे वंदिती । चरणरज ते यम ॥८॥

24

दुर्लभ नरदेह झाला तुह्मां आह्मां । येणें साधूं प्रेमा राघोबाचा ॥१॥
अवघे हातोहातीं तरों भवसिंधु । आवडी गोविंदु गाऊं गीतीं ॥२॥
हिताचिया गोष्टी सांगूं एकमेकां । शोक मोह दु:खा निरसूं तेणें ॥३॥
एकमेकां करूं सदा सावधान । नामीं अनुसं-धान तुटों नेदूं ॥४॥
घेऊं सर्वभावें रामनाम दिक्षा । विश्वासें सकळिकां हेंचि सांगों ॥५॥
नामा ह्मणे शरण रिघों पंढरीनाथा । नुपेक्षी सर्वथा दीनबंधु ॥६॥

25

नाम ह्मणावया तूं कांरे करंटा । काय तुझे अदृष्टां लि-हिलें असे ॥१॥
यमाचे यमपाश पडतील गळां । जाशील सगळा काळामुखीं ॥२॥
शरीराची आशा बाळ हें तारुण्य । अवचित वृद्धपण येईल मूढा ॥३॥
लक्ष्मी धन मद पुत्र स्त्री घरदार । नेतां यमर्किकर न सोडिती ॥४॥
मायबाप सखी न येती सांगातें । जंव शरीरीं पुरतें बळ आहे ॥५॥
न येती सांगातें सज्जन सोयरीं । वानप्रस्थ ब्रह्मचारी श्रेष्ठ झाले ॥६॥
घेशील तूं सोंग संन्यास आश्रम । सांडोनि घराश्रम न सुटसी ॥७॥
नामा ह्मणे नाम नित्य नरहरी । म्हणतां श्रीहरी तरशील ॥८॥

26

बाल वृद्ध तरुण काया हे जर्जर । वेगीं हा पामर आळशी झाला ॥१॥
काय करूं देवा नाहीं यासि भावो । न करी हा उपावो तुझ्या भजनीं ॥२॥
मन ठेवीं ठायीं रंगेम तूं श्रीरंगीं । गोष्टी त्या वाउगी बोलूम नको ॥३॥
नामा म्हणे श्रीरंगु चित्तीं पां चोखडा । उघडा पवाडा सांगितला ॥४॥

27

धनमानबळें नाठविसी देवा । मृत्युकाळीं तेव्हां कोण आहे ॥१॥
यमाचे यमदंड बैसतील माथां । तेव्हां तुज रक्षिता कोण आहे ॥२॥
मायबापबंधु तोंवरी सोयरीं । इंद्रियें जोंवरी वाह-ताती ॥३॥
सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता । तेहि केश देतां रडतसे ॥४॥
विष्णुदास नामा जातांचि शरण । स्वप्नीं जन्म-मरण नाहीं नाहीं ॥५॥

28

भुक्ति मुक्ति सिद्धि यावया कारणें । सेवकासी देणें पांडुरंगा ॥१॥
ऐसिया तुज सांगणें आपणातें म्हणक्ति । तया अधोगति कल्पकोडी ॥२॥
देहो सरल्या मिळे ज्योतीस ज्योति । ऐसें ह्मणतां किती सिंतरिले ॥३॥
नामा ह्मणे ऐसें नाशिवंत शरीर । पूजा हरिहर एक वेळां ॥४॥

29

विषयाचा आंदण दिसे केविलवाणा । करीतसे कल्पना नानाविध ॥१॥
कुटुंब पाईकं ह्मणवी हरिचा दास । मागे ग्रासोग्रास दारोदारीं ॥२॥
जळो त्याचें कर्म जळो त्याचा धर्म । जळो तो आश्रम जाणीवेचा ॥३॥
कल्पद्रुमातळीं काखे घेऊनि-झोळी । बैसोनि सांभाळी भिक्षा अन्न ॥४॥
अधम पोटभरी विचार तो न करी । पुढती दारोदारी हिंडो जाय ॥५॥
पोटालागीं करी नाना विटंबना । संतोषवी मना दुर्जनांच्या ॥६॥
न करी हरीचें ध्यान बैसोनि एकांतीं । जन्माची विश्रांति जेणें होय ॥७॥
द्रव्याच्या अभिलाषें जागे सटवीपाशीं । नवजे एकादशी जागरणा ॥८॥
उत्तम मध्यम अधम न बिचारी । स्तुति नाना करी आशाबद्ध ॥९॥
वैराग्याची वार्ता कैची दैवहता । नुपजे सर्वथा प्रेमभाव ॥१०॥
नामा ह्मणे ऐसें तारी एक्या गुणें । अजा आरोहण गजस्कंधीं ॥११॥

30

पापाचें संचित देहासी दंडण । तुज नारायणा बोल नाहीं ॥१॥
सुख अथवा दु:ख भोगणें देहासी । सोस वासनेसी वा-उगाची ॥२॥
पेरि कडु जीरें इच्छी अमृतफळ । अर्किवृक्षा केळीं येती ॥३॥
मुसळाचें धनु न होय सर्वथा । पाषान पिळितां रस कैंचा ॥४॥
नामदेव म्हणे देवा कां रुसावें । मनाला पुसावें आपुलीया ॥५॥

31

देहाचें ममत्व नाहीं जों तुटलें । विषयीं किटलें मन नाहीं ॥१॥
तंव नित्य सुख कैसेंनि आतुडे । नेणती बापुडे प्रेमसुख ॥२॥
मीच एक भक्त मीच एक मुक्ता । म्हणती पतित दुराचारी ॥३॥
नामा म्हणे तुझे कृपेविण देवा । केंवि जोडे ठेवा विश्रांतीचा ॥४॥

32

भक्तीविणें जिणें जळो लजिरवाणें । संसार भोगणें दु:खरूप ॥१॥
एक एक योनि कोटि कोटि फेरा । मनुष्य देहवारा मग लागे ॥२॥
वीस लक्ष योनि वृक्षामध्यें ध्याव्या । जळचरीं भोगाव्या मव लक्ष ॥३॥
अकरा लक्ष योनी किरडामध्यें घ्याव्या । दश लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्यें ॥४॥
तीस लक्ष योनि पशूंचिये घरीं । मानवाभीत्तरीं चारी लक्ष ॥५॥
नामा ह्मणे तेव्हां नरदेह या नरा । तयानें मातेरा केला मूढें ॥६॥

33

शेवटिली पाळी तेव्हां मनुष्य जन्म । चुकलीया वर्म फेरा पडे ॥१॥
एक जन्मीं ओळखी करा आत्मारामा । संसार सुगम भोगूं नका ॥२॥
संसारीं असावें असोनि नसावें । कीर्तन करावें वेळोवेळां ॥३॥
नामा ह्मणे विठो भक्ताचिये द्वारीं । घेऊ-नियां करीं सुदर्शन ॥४॥

34

वावडी दुरीच्या दुरी उडतसे अंबरीं । हातीं असे दोरी परि लक्ष तेथें ॥१॥
दुडी वरी दुडी पाण्या निघाली गुजरी । चाले मोकळ्या करीं परी लक्ष तेथें ॥२॥
व्यभिच्यारी नारी परपु-रुष जिव्हारी । वर्ते घरोचारीं परि लक्ष तेथें ॥३॥
तस्कर नगरीं परद्रव्य जिव्हारी । वर्ते घरोघरीं परि लक्ष तेथें ॥४॥
धन लो-भ्यानें धन ठेवियलें दुरी । वर्ते चराचरीं परि लक्ष तेथें ॥५॥
नामा ह्मणे असावें भलतियां व्यापारीम । लक्ष सर्वेश्वरीं ठेऊनियां ॥६॥

35

भक्तीविण मोक्ष नाहीं हा सिद्धांत । वेद बोले हात उभारोनि ॥१॥
तरी तेंचि ज्ञान जाणाया लागुनि । संतां वोळगोनि वश्य किजे ॥२॥
प्रपंच हा खोटा शास्त्रें निवडिला । पाहिजे साक्षिला सद्‍गुरु तो ॥३॥
नामा म्हणे सेवा घडावी संतांची । घ्यावी कृपा त्याची तेंचि ज्ञान ॥४॥

36

हरीविण जिणें व्यर्थचि संसारीं । जग अलंकारी मिरवीत ॥१॥
देवाविण शब्द लटकें करणें । भांडा रंजविणें सभे-माजी ॥२॥
आचार करणेम देवावीन जो गा । सर्पाचिया अंगा मृदुपण ॥३॥
नामा म्हणे काय बहु बोलों फार । भक्तीविण नर अभागी तो ॥४॥

  • मुख्य पृष्ठ : संपूर्ण काव्य रचनाएँ : संत नामदेव जी
  • मुख्य पृष्ठ : हिन्दी कविता वेबसाइट (hindi-kavita.com)